नेहमी इतरांना मदत करणारा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आता स्वत:च कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. लुधियाना कोर्टाकडून त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. न्यायमूर्ती रमणप्रीत कौरने हा वॉरंट जाही केला आहे. सोनू सूदला एका प्रकरणात कोर्टात साक्ष देण्यासाठी अनेकदा समन्स पाठवण्यात आलं. मात्र तो एकदाही आला नाही. त्यामुळे आता त्याच्याविरोधात थेट अटक वॉरंटच निघालं आहे. नक्की कोणतं आहे हे प्रकरण वाचा.
लुधियानाचे वकील राजेश खन्नाने मोहित शुक्ला या व्यक्तीविरोधात १० लाखांची फसवणुकीची केस दाखल केली. शुक्लाने त्यांना गुंतवणुकीचं आमिष दाखवत त्याची फसवणूक केली होती. याचप्रकरणात सोनू सूदलाही साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र अनेकदा समन्स मिळूनही तो कोर्टात हजर झाला नाही. आता त्याला थेट अटक करण्याचा कोर्टाचा आदेश आहे. हे वॉरंट मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे. यामध्ये अभिनेत्याला अटक करणं आणि त्याला कोर्टात घेऊन येण्याचे आदेश दिले आहेत.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारीला होणार आहे. अद्याप अभिनेत्याने यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. सोनू सूदचा नुकताच 'फतेह' सिनेमा रिलीज झाला. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोनूने स्वत:च या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं.