प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) आजपर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तसेच त्याने अनेक कलाकारांना सिनेइंडस्ट्रीत लाँच केलं आहे. राजकुमार राव, पंकज त्रिपाठी हे प्रभावी अभिनेते अनुराग कश्यपमुळेच आपल्याला मिळाले आहेत. दरम्यान सध्या फिल्म इंडस्ट्रीत केवळ पैशांचा खेळ सुरु झाला असून यामुळेच अनुराग कश्यपने मोठा निर्णय घेतला आहे. जो ऐकून चाहते नक्कीच निराश होणार आहेत.
'द हॉलिवूड रिपोर्टर ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यप म्हणाला, "आता इथे सिनेमा बनवण्यात काही मजा राहिली नाही. सहा वर्षांपूर्वी बनवलेला सिनेमा जशाच्या तसा आज बनवायचा झाला तर तेव्हापेक्षा सहापट जास्त खर्च होईल. यात सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे सिनेमा बनवण्यात आता मजा राहिलेली नाही कारण आता सगळं पैशात मोजलं जात आहे. आता बाहेर जाऊन सिनेमा बनवणं माझ्यासाठी कठीण आहे. सुरुवातीपासून आपला सिनेमा कसा विकला जाईल याकडेच लक्ष दिलं जात आहे. मूळ सिनेमा बनवण्यात जी मजा आहे ती संपत चालली आहे. म्हणूनच मला आता इथून बाहेर पडायचं आहे. मी मुंबईतून बाहेर पडणार आहे. मी आता साऊथला जाणार आहे. मला तिथे जायचंय जिथे मला काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. नाहीतर मी म्हाताऱ्या माणसासारखा इथेच मरेन. आपल्याच इंडस्ट्रीत जे सुरु आहे ते मला पटत नाहीए आणि मी अक्षरश: निराश झालो आहे.
मी मंजुमल बॉईज बघितला. असा सिनेमा हिंदीत कधीच बनला नसता. पण जेव्हा साऊथमध्ये असं काहीतरी हिट होतो तेव्हा लगेच हिंदीत त्याचा रिमेक बनवण्याच्या हालचाली सुरु होतात. मी सिनेमावर पोस्ट लिहिली होती तर दुसऱ्याच दिवशी मला याचे हक्क कोणाकडून घेता येतील, कोण आहे निर्माता, तू ओळखतो का असं विचारायला एकाचा फोन आला होता. फक्त रिमेक बनवणं हेच हिंदी इंडस्ट्रीत उरलं आहे. स्वत: काहीच नवीन प्रयोग करणार नाही. मला खरंच याचा कंटाळा आला आहे. सगळ्यांना फक्त स्टार बनायचं आहे. एजन्सी सुद्धा त्यातून पैसा कमावत आहे."