Join us

मुंबईत भाड्याच्याच घरात राहतात अनुपम खेर, अद्याप घर खरेदी न करण्यामागचं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:34 IST

अनुपम खेर यांचं घर खरेदी न करण्यामागचं कारण खूप इंटरेस्टिंग आहे.

अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत आहेत. एकापेक्षा एक भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी खलनायक तर कधी कॉमेडी करत त्यांनी टॅलेंट सिद्ध केलं. सोशल मीडियावरही ते सक्रीय आहेत. आपल्या संघर्षाचे दिवस आठवून ते अनेकदा भावुक होतात. इतकंच नाही तर ते अजूनही भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी कधीच मुंबईत घर खरेदी केलं नाही. यामागचं कारण त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

अनुपम खेर यांनी Curly Tales ला मुलाखत दिली. ते म्हणाले, "आजही माझ्याकडे स्वत:चं घर नाही. मी मुंबईत भाड्याच्या घरात राहतो. मी आयुष्यात एकच घर खरेदी केलं तेही आईच्या नावावर. ते घर सिमलामध्ये आहे. मुंबईत भाड्याच्याच घरात राहायचं हा त्यांचाच निर्णय होता."

घर खरेदी न करण्याचं कारण सांगत ते म्हणाले, "मला भाडं द्यायला आवडतं. घर खरेदी करण्यापेक्षा मी ते पैसे बँकेत ठेवतो. असं यासाठी कारण मला वाटतं आपण मेल्यानंतर घरासाठी इतरांनी भांडणं करावं याऐवजी आपण लोकांना काहीतरी देऊन जाणं चांगलं आहे."

ते पुढे म्हणाले, "सात वर्षांपूर्वी मी आईला विचारलं की एक मोठा स्टार झालो आहे तर तुला माझ्याकडून काय पाहिजे? यावर तिने लगेच सिमल्यात घर हवं असं सांगितलं. वडिलांचं निधन झाल्यानंतर आई भाड्याच्याच घरात राहिली आहे. म्हणूनच मी आईसाठी घर घेतलं. साधंसुधं नाही तर ९ बेडरुम्सचं ते घर आहे. जेव्हा आईने एवढं मोठं घर पाहिलं तेव्हा ती मला ओरडली. एवढ्या मोठ्या घरात मी काय करु? मला नको एवढं घर. अशा प्रकारे मी तिचं स्वप्न साकार केलं."

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूडसुंदर गृहनियोजनमुंबई