Join us

Chandramukhi : ‘हे गाणं नाही, अनुभव आहे...’, ‘चंद्रमुखी’च्या गाण्यानं नेटकऱ्यांना पाडलं प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:56 IST

Chandramukhi Marathi movie : गेल्या 9 एप्रिलला ‘तो चांद राती’ हे ‘चंद्रमुखी’चं गाणं रिलीज झालं. तेव्हापासून या गाण्याची चाहत्यांना जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या प्रेमगीतावर फिदा आहेत.

Chandramukhi Marathi movie : ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. कारणही तसंच आहे. अमृता खानविलकरसारखी (Amruta Khanvilkar) गोड चेहऱ्याची चंद्रा, आदिनाथ कोठारेनं (Addinath Kothare) साकारलेला पिळदार शरीरयष्टीचा ध्येयधुरंदर दौलतराव देशमाने, अजय-अतुलचं कर्णमधूर संगीत आणि प्रसाद ओकचं दिग्दर्शन असा सगळा सुरेख संगम म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचणारच. गेल्या अनेक दिवसांपासून ‘चंद्रमुखी’ची चर्चा होतेय आणि आता तर हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतोय, असं चाहत्यांना झालंय. चित्रपटाच्या गाण्यांनी तर चाहते ठार वेडे झाले आहेत. विशेषत: ‘तो चांद राती’ या गाण्यावर चाहते फिदा आहेत. 

गेल्या 9 एप्रिलला ‘तो चांद राती’ हे ‘चंद्रमुखी’चं गाणं रिलीज झालं. तेव्हापासून या गाण्याची चाहत्यांना जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या प्रेमगीतावर फिदा आहेत. या गाण्यावरच्या नेटकऱ्यांच्या कमेंट्स बघून तुम्हालाही विश्वास बसेल.

अमृता खानविलकरने या गाण्यावरच्या चाहत्यांच्या कमेंट्सची एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘हे गाणं नाही तर एक अनुभव आहे,’अशा शब्दांत एका चाहत्याने या गाण्याचं कौतुक केलं आहे. आवाज, शब्द, संगीत, कलाकार, दिग्दर्शन... पंचसंगम, अशा शब्दांत एका चाहत्याने या गाण्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आईशप्पथ, गजब साँग आहे. अंगावर काटा येणार ऐकून, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अन्य एका चाहत्याने दिली आहे. क्रिती अप्रतिम झालं आहे हे गाणं. आवाज हृदयाला भिडतो आणि शब्द मोहळ घालतात, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. एकंदर काय तर चाहते या गाण्याच्या अक्षरश: प्रेमात पडले आहेत.

आपल्या लावण्यानं आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्र आहे. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या 29 एप्रिलला प्रदर्शित होतोय.

टॅग्स :चंद्रमुखीअमृता खानविलकरआदिनाथ कोठारेसिनेमा