बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. ट्विटरवर तर ते सर्रास सतत ट्वीट करत असतात. अगदी मध्यरात्रीही त्यांचं एखादं ट्वीट असतं. यावर चाहते त्यांना झोपण्याचा सल्ला देताना दिसतात. अनेकदा बिग बी काही ट्वीटनंतर ट्रोलही होतात. आता पुन्हा तेच झालं आहे. काल दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालं. मात्र अमिताभ बच्चन यांनी मनोज कुमार यांच्यासाठी एकही ट्वीट केलं नाही. उलट त्यांनी रात्री एका गोष्टीचा आनंद साजरा करणारं ट्वीट केलं. यावरुन ते ट्रोल झालेत. कोणतं आहे ते ट्वीट?
मनोज कुमार हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमधून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती. चाहत्यांना अपेक्षा होती की अमिताभ बच्चन सुद्धा एखादं ट्वीट करतील. मात्र बिग बींनी काल रात्री भलतंच ट्वीट केलं. त्यांची कबड्डी टीम जयपूर पिंक पँथर्सच्या विजयाचा आनंद साजरा करणारं ते ट्वीट होतं. ते पाहताच चाहत्यांनी राग व्यक्त केला. हे ट्वीट करु शकता पण मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहू शकत नाही? असं म्हणत चाहत्यांनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी मनोज कुमार यांच्यासोबत 'रोटी करडा और मकान' हा सिनेमा केला होता. एका युजरने अमिताभ बच्चन यांना याचीच आठवण करुन दिली. 'बच्चन साहेब तुम्ही अपडेट नसता का मनोज कुमार यांचं निधन झालं आहे तुम्ही एकही ट्वीट केलं नाही. खूपच दु:खद' असंही एका युजरने लिहिलं आहे.
याआधीही बिग बींनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केलं होतं. मात्र आता मनोज कुमार यांच्यासाठी त्यांनी अद्याप एकही ट्वीट न केल्याने ते ट्रोल होत आहेत.