सोशल मीडियावर सेलिब्रिटींना होणारं ट्रोलिंग आता काही नवीन नाही. बिग बॉस फेम अभिनेता अली गोनीला (Aly Goni) काही दिवसांपूर्वी ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. अली गोनी त्याच्या मित्रपरिवारासोबत गणेशोत्सवात सहभागी झाला होता. तो त्याच्या एका मित्राच्या घरी गणपतीसाठी गेला होता. त्याच्यासोबत गर्लफ्रेंड जास्मीनही होती. जास्मीन, निया शर्मा आणि अली गोनी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये तिघंही डान्स करत आहेत आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत आहेत. मात्र अली गोनीच्या तोंडून गणपती बाप्पा मोरया निघालंच नाही. यावरुन अलीला जबरदस्त ट्रोलिंग करण्यात आलं. इतकंच नाही तर आता त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत अली गोनी म्हणाला, "सोशल मीडियावर हा व्हिडिओ अती व्हायरल झाला आहे. लोक ट्वीट करुन माझ्यावर एफआयआर झाली पाहिले अशा कमेंट्स करत आहेत. मी मुसलमान आहे म्हणूनच मला लक्ष्य केलं जात आहे पण असे बरेच हिंदू आहेत जे घरी गणपती बसवत नाहीत. मग त्यांनाही हिंदू म्हणायचं नाही का? ते पण तर हिंदू आहेत ना. मला धमक्या येत आहेत. माझे ईमेल्स भरलेले आहेत. ट्रोलर स्त्री असूनही ती जास्मीनला शिव्या देत आहे. मला कितीही धमक्या मिळाल्या तरी मला फरक पडत नाही. पण जर माझ्या जवळच्या माणसांना काही बोलाल तर हिंमत असेल तर समोर या मी त्यांचा गळा कापेन. माझी आई, बहीण आणि जास्मीन यांच्याविषयी काहीही बोलाल तर मी सहन करणार नाही."
"मी दहशतवादी झालोय, मला पाकिस्तान जायला हवं, मी लव्ह जिहाद करतोय अशा कमेंट्स मी वाचल्या आहेत. या लोकांना मला सांगायचंय की तुम्हाला कल्पना नाही की मी दान देताना धर्म बघून दान देत नाही. मी काय करतोय हे मला जगाला दाखवायचं नाही. तो हिंदू, मुसलमान काय आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही."