बॉलिवूडमध्ये एक टीकाटिप्पणी कायम ऐकायला मिळते ती म्हणजे अक्षय कुमार (akshay kumar) वर्षातून वर्षातून तीन-चार सिनेमे येत आहेत. अक्षय घाईत सिनेमांंचं शूटिंग उरकतो. परिणामी त्यापैकी एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालत नाहीये, अशीही चर्चा आहे. अक्षयचा सहकलाकार म्हणून आणि गेली अनेक वर्ष त्याच्यासोबत काम करत असल्याने अभिनेते परेश रावल (paresh rawal) यांनी याच विषयावर पहिल्यांदा भाष्य केलंय.
अक्षय कुमार वर्षातून चार सिनेमे करतो, परेश रावल म्हणतात...
परेश रावल यांनी एका मुलाखतीत सांगितलंय की, "तो जे करतोय ते मी नाही करु शकत. तो केवळ मेहनती नाही तर प्रामाणिकही आहे. तो जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा त्यात कोणताही छुपा अजेंडा नसतो. तो एक फॅमिली मॅन आहे आणि अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. त्याच्यासोबत बोलणं आणि त्याच्यासोबत राहणं मला आवडतं. तो जर इतके सिनेमे करत असेल तर तुम्हाला काय समस्या आहे? लोक सिनेमे बनवण्यासाठी त्याच्याजवळ जातात ना? मी निर्माता म्हणून एका अभिनेत्याला तेव्हाच साईन करेन जेव्हा तो पैशांचा परतावा परत आणून देऊ शकेल."
"त्याला सातत्याने काम करायला आवडतं. तो कोणतीही तस्करी करत नाहीये. किंवा दारुचा पुरवठा करत नाहीये. तो जुगार किंवा अंगली पदार्थांचा व्यवसाय करत नाहीये. तो जेव्हा काम करतो तेव्हा किती रोजगार निर्माण होतो हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. " सध्या अक्षय कुमार आणि परेश रावल 'हेरा फेरी ३'साठी काम करत आहेत. याशिवाय अक्षयच्या आगामी 'भूत बंगला' सिनेमाचीही सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात अक्षयसोबत तब्बू, राजपाल यादव, असरानी, वामिका गब्बी हे कलाकार झळकणार आहेत. २ एप्रिल २०२६ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.