Join us

शाहरुख-सलमानच्या घरी आयकर विभागाची धाड पडली तर काय करशील? अजय देवगण म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:51 IST

अजय देवगणचा सेन्स ऑफ ह्युमर तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याच स्टाईलमध्ये त्याने हे उत्तर दिलं आहे.

अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) बहुप्रतिक्षित 'रेड २' (Raid 2) चा ट्रेलर आला आहे. अजय देवगण आयकर अधिकारी अमर पटनायकची भूमिका साकारत आहे. सिनेमात रितेश देशमुख जो नेता आहे त्याच्या घरी आयकर विभागाची धाड पडते. त्यामुळे यावेळी अजय आणि रितेश यांच्यातला फेस ऑफ पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कालच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. यावेळी अजयने माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

अजय देवगण आणि रितेश देशमुखच्या 'रेड २'चा ट्रेलर अतिशय दमदार आणि खिळवून ठेवणारा आहे. ७४ केसेस यशस्वीरित्या सोडवल्यानंतर आता अमर पटनायक त्याची ७५ केस सोडवण्यासाठी सज्ज आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचनंतर अजय देवगणला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की,'जर शाहरुख-सलमानच्या घरी आयकर विभागाची धाड पडली तर तू काय करशील?' यावर अजय देवगण म्हणाला,"मी सिनेमात आयकर अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. मी त्यांच्या का जाईन?. जर त्यांच्या घरी आयकर विभागाची धाड पडली तर मी माझ्या घरीच थांबेन. मी काहीही मॅनेज करु शकत नाही."

अजय देवगणचा सेन्स ऑफ ह्युमर तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याच स्टाईलमध्ये त्याने हे उत्तर दिलं आहे. सिनेमात वाणी कपूर अजयच्या बायकोच्या भूमिकेत आहे. दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तसंच सौरभ शुक्लाही सिनेमात दिसणार आहे जे पहिल्या भागात मुख्य खलनायक होते. आता या सिनेमात ते रितेशच्या काकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १ मे रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. 

टॅग्स :अजय देवगणशाहरुख खानसलमान खानबॉलिवूडधाड