Join us

निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?

By कोमल खांबे | Updated: July 3, 2025 17:24 IST

Nilesh Sable & Bhau Kadam Exit: निलेश साबळे पाठोपाठ भाऊ कदमनेही 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे. निलेश साबळेनेच याचा खुलासा करत यामागचं कारणही सांगितलं आहे.

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण, या सीझनमध्ये जुन्या चेहऱ्यांची जागा काही नवीन कलाकारांनी घेतली आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या या नव्या सीझनमध्ये निलेश साबळे दिसणार नाहीये. या शोमधून त्याने एक्झिट घेतली आहे. या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत खांडकेकरवर सोपवण्यात आली आहे. निलेश साबळे पाठोपाठ भाऊ कदमनेही 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे.  निलेश साबळेनेच याचा खुलासा करत यामागचं कारणही सांगितलं आहे. 

निलेश साबळेवर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी आरोप केले होते. त्या आरोपांना प्रत्युतर देत निलेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने 'चला हवा येऊ द्या' सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. त्यासोबतच भाऊ कदमही शोमध्ये दिसणार नसल्याचा गौप्यस्फोट त्याने केला आहे. "माझ्याप्रमाणेच भाऊ कदमही या कार्यक्रमात नसतील", असं निलेशने म्हटलं आहे. 

नेमकं कारण काय? 

निलेश सध्या वेगळ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. सध्या तो एक सिनेमा करत आहे. ज्याच्या शूटिंगसाठी अजून एक-दीड महिना वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे तारखा न जुळल्याने या कार्यक्रमातून निलेश साबळेने माघार घेतली आहे. निलेशच्या या सिनेमात भाऊ कदमही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आणि याच कारणामुळे भाऊ कदमही 'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसणार नसल्याचं निलेश साबळेने सांगितलं आहे. याशिवाय इतर कोणतंही कारण नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. 

'चला हवा येऊ द्या' शोचं निलेश साबळे सूत्रसंचालन करायचा. याच शोमुळे भाऊ कदमला प्रसिद्धी मिळाली. त्याच्या कॉमेडी टायमिंगवर प्रेक्षकांची विशेष दाद मिळायची. १० वर्ष मनोरंजन केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या' शोने निरोप घेतला होता. आता याचा पुढचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, यात भाऊ कदम नसल्याने चाहते नाराज होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :चला हवा येऊ द्याभाऊ कदममराठी अभिनेताटिव्ही कलाकारसोशल मीडिया