Join us

मालिकेचं शूट सुरु झालं तरी हिरो ठरला नव्हता, आदिनाथने सांगितला 'नशिबवान'चा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:06 IST

आदिनाथने मालिका करण्याचं का ठरवलं?

हँडसम हंक, रोमँटिक हिरो म्हणून ओळख असलेला अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर येत आहे. त्याची 'नशिबवान' ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु झाली आहे. अभिनेत्री नेहा नाईक ही मुख्य अभिनेत्री असून तिची ही पहिलीच मालिका आहे. विशेष म्हणजे 'कोठारे व्हिजन'च या मालिकेची निर्मिती करत आहे. आदिनाथ हिंदी सिनेमा, सीरिजमध्ये दिसत असताना अचानक मराठी मालिकेत येत असल्याने सर्वांना सुखद धक्काच बसला. आदिनाथ मालिका करणार हे कसं ठरलं याचा किस्सा त्याने स्वत:च मुलाखतीत सांगितला आहे.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत आदिनाथ म्हणाला, "गेली दोन तीन वर्ष मी चांगल्या मालिकेच्या शोधात होतो. माझी मालिका करण्याची खूप इच्छा होती. मी सगळ्या माध्यमातून काम करतोय आणि एका चांगल्या कलाकृतीचा भाग होण्याची कलाकाराची नेहमीच इच्छा असते. मग ते कोणतंही माध्यम असो. ती कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आपण निर्माता, दिग्दर्शक, लेखक किंवा नट अशा वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो. तर मी नट म्हणून एक मालिका शोधत होतो. सतीश राजवाडेंशीही मी बोललो होतो. आमची बरीच चर्चा सुरु होती काय करता येईल पण योग जुळून येत नव्हता."

दरम्यान काही दिवसांपूर्वी नशिबवान मालिकेचं कास्टिंग सुरु झालं होतं. या मालिकेची कथा, मांडणी खूप वेगळी आहे. त्यात अनेक युनिक फॅक्टर्स आहेत. त्यामुळे माझ्यासाठी निर्माता म्हणूनही ही मालिका खास होती. या मालिकेत मुख्य खलनायकाचं सगळ्यात आधी कास्टिंग झालं. अनेक काळानंतर मालिकेत खलनायिका नाही तर एक खलनायक बघायला मिळणार आहे. नंतर अभिनेत्रीचं कास्टिंग सुरु झालं. मग सतीश सरांकडूनच नेहाचं नाव आलं आणि नेहा नाईकची निवड झाली. तोवर आमचा हिरो लॉक होत नव्हता. पहिला प्रोमो शूट झाला तेव्हाही हिरो ठरला नव्हता. शूटिंग सुरु झालं तेव्हाही हिरो कोण ठरलं नव्हतं. मग एकदा आमच्या कंपनीची सीईओ चार्वीनेच मला विचारलं की 'आदिनाथ, तूच का नाही करत?'. मग मी घरी बोललो, चर्चा केली. सतीश राजवाडेंना फोन केला की मी करु का? तेव्हा ते दोन सेकंद शांत बसले. मग म्हणाले, 'तुला खात्री आहे?' मी म्हणालो, 'हो, मी करेन' आणि अशा प्रकारे माझी एन्ट्री झाली.

टॅग्स :आदिनाथ कोठारेटेलिव्हिजनमराठी अभिनेता