Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझी रडारड सुरु होती त्यावेळी..."; 'झापुक झुपूक'मध्ये सूरजच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 13:19 IST

 ‘झापुक झुपूक’ सिनेमात सूरज चव्हाणच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सांगितला खास अनुभव (suraj chavan)

सध्या मराठी मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे  ‘झापुक झुपूक’. शुक्रवारी (११ एप्रिल)  ‘झापुक झुपूक’  सिनेमाचा (zapuk zupuk movie) ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये सूरज चव्हाणचा (suraj chavan) दमदार अभिनय बघायला मिळाला. या सिनेमात सूरज चव्हाणच्या बहिणीची भूमिका अभिनेत्री पायल जाधव (payal jadhav) साकारताना दिसणार आहे.  ‘झापुक झुपूक'च्या ट्रेलर लाँचला पायलने तिच्या मनातील भावना शेअर केल्या.  पायलने सूरज बिग बॉस मराठीत असताना त्याला राखी बांधली होती. हीच पायल आता मोठ्या पडद्यावर सूरजच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे.

पायलने ट्रेलर लाँचच्या वेळी व्यक्त केल्या भावना

पायलने ‘झापुक झुपूक’ सिनेमाच्या ट्रेलर लाँचला खास किस्सा सांगितला. ती म्हणाली की, "मी बिग बॉसच्या घरात सूरजला राखी बांधली. झालं असं होतं की,आम्हाला सांगितलं होतं की,११ वाजता बिग बॉसच्या घरात जायचंय.त्यामुळे विचार करुन घ्या. मालिका चालू होती त्यामुळे फार बघायला मिळत नव्हतं. पण रक्षाबंधन होतं त्यावेळी आणि माझ्या सख्ख्या भावाचं नावही सूरज आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी माझ्या भावाला राखी नाही बांधू शकत, अशी माझी रडारड सुरु होती. माझा नवरा म्हणाला की,ठीकेय. सूरज तुझ्या गावचा आहे, तुझ्याच जवळचा आहे,  आपल्याच पट्ट्यातला आहे. त्यामुळे तू सूरज चव्हाणला राखी बांध. मी म्हटलं ठीकेय, बांधते."

"मी बिग बॉसच्या घरात सूरजला राखी बांधली, आम्ही मिठी मारली, मी वळले आणि मग त्याने नमस्कार केला. तो माणूसच इतका गोड आहे. इथे बसलेल्या सगळ्या लोकांपेक्षा मी जास्त नशीबवान आहे की, अभिनेत्री म्हणून मला सूरज चव्हाणच्या बहिणीचं पात्र करता येतंय. खूप वेगळा अनुभव आहे हा. छान वाटतंय." जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" हा सिनेमा २५ एप्रिलला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :केदार शिंदेमराठी अभिनेतामराठी चित्रपटबिग बॉस मराठी