मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते म्हणजे अशोक सराफ.अशोक सराफ अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या अशोकमामांना काहीच दिवसांपूर्वी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. हा मानाचा पुरस्कार मिळाल्यावर अशोक सराफ यांचं सर्वजण अभिनंदन करत आहेत. याशिवाय अशोकमामांविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर करत आहेत. अशातच सध्या 'अशोक मा.मा.' या मालिकेत अशोक सराफ यांच्यासोबत काम करणारी अभिनेत्री नेहा शितोळेने तिचा अनुभव शेअर केलाय.
नेहा शितोळेची अशोक सराफ यांच्याविषयी खास पोस्ट
नेहाने अशोक सराफ यांच्यासोबत फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "मागच्या फळ्यावर लिहिलेल्या महाराष्ट्र भूषण, विनोद सम्राट, मामा आणि आता पद्मश्री श्री अशोक सराफ... ह्या आणि अशा अनेक बिरुदांच वलय आपल्या कामामुळे स्वतःभोवती घेऊन फिरणारा हा नट जेव्हा माणूस म्हणून भेटतो, कळतो आपल्याला समजून घेतो आणि हळू हळू कामाच्या पलीकडे एका मित्रत्वाच्या भावनेनं त्याच्या अनुभवाच्या शिदोरीतला (आणि रोजच्या डब्यातला सुद्धा) खाऊ आपल्या बरोबर वाटून घेतो तेव्हा ह्या खूप मोठ्ठ्या माणसाबरोबर काम करण्याचं भाग्य म्हणजे नक्की काय हे उमगतं... नशीब काढलंय मी एवढं नक्की... मामा, खूप खूप अभिनंदन आणि ह्या शुभेच्छा मला प्रत्यक्ष तुम्हाला देता येतायत ह्या बद्दल स्वतःचं ही आज अभिनंदन करावं असं वाटतंय..."
अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या कलाविश्वातील अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' हा प्रतिष्ठित पुरस्कार काहीच दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. त्यानंतर चाहत्यांसोबत कलाकारदेखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आणि अशोक मामांच्या चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या.