बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जी आतापर्यंत अनेक प्रभावी भूमिकांमध्ये दिसली आहे. 'पिंक', 'मिशन मंगल' या काही सिनेमांमध्ये ती दिसली. तिची 'क्रिमिनल जस्टिस' सीरिजही गाजली. ती अभिनेत्री आहे किर्ती कुल्हारी. काही दिवसांपूर्वी किर्ती कुल्हारीने Kirti Kulhari) केस कापून एकदम शॉर्ट केले होते. अभिनेत्री असूनही तिने बॉबकट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नुकतंच एका मुलाखतीत किर्तीने त्यावर भाष्य केलं आहे.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत किर्तीला प्रश्न विचारण्यात आला. केस कापल्यानंतर आलेली सर्वात चांगली आणि सर्वात वाईट प्रतिक्रिया कोणती? यावर किर्ती कुल्हारी म्हणाली, "मी जेव्हा केस कापले तेव्हा मला लोकांचे मेसेज यायला लागले. मला एका टीनएज मुलीच्या वडिलांचा मेसेज आला. ते म्हणाले की माझी मुलगी तुझ्याकडून खूप प्रेरित झाली आहे. आता ती सुद्धा केस कापणार आहे. मला खूप छान वाटलं की माझ्या एका कृतीमुळे कोणालातरी प्रेरणा मिळाली आहे. मी 'हिसाब बराबर'चं शूट संपल्यानंतर केस कापून टाकले. मला चांगल्या कमेंट्स आल्या. अशा महिलांकडून ज्यांची हे करण्याची हिंमतच होत नव्हती. मी ही हिंमत केली आणि मला आता पुढे प्रोजेक्ट मिळतील की नाही असा विचारच केला नाही. "
ती पुढे म्हणाली, "निगेटिव्ह कमेंट म्हटलं तर मला कमेंट्स आल्या की जसं काय मी आता लेस्बियन असल्याचं जाहीर करणार आहे. माझे केस लांब असतील तर मी लेस्बियन नाही आणि जर शॉर्ट केले तर मी लेस्बियन झाले? मला लोकांच्या या विचारामुळे आश्चर्यच वाटलं."
किर्ती कुल्हारी नुकतीच 'हिसाब बराबर'सिनेमात दिसली. यामध्ये तिने आर माधवनसोबत स्क्रीन शेअर केली आहे. याशिवाय ती 'बॅडअॅस रवीकुमार' मध्येही दिसणार आहे.