कंगना राणौत ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. 'तनू वेड्स मनू', 'तनू वेड्स मनू रिटर्न', 'रिव्हॉलवर रानी', 'मणिकर्णिका' अशा सिनेमांमधून दमदार अभिनय करुन सर्वांच्या मनात स्वतःचं घर केलंय. कंगनाच्या सिनेमावर पहिल्याच दिवशी पंजाबमध्ये बंदीची मागणी करण्यात आली. त्यामुळे पहिल्याच दिवशी कंगनाच्या सिनेमाला मोठा फटका बसला आहे. अखेर या प्रकरणावर कंगनाने मौन सोडलंय.
कंगनाने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप
पंजाबमधील एका संघटनेने मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून इमर्जन्सीवर बंदीची मागणी घालण्याचं पत्र लिहिलं होतं. हे कळताच कंगना म्हणाली की, "कला आणि कलाकृती या सर्वांचा हा मानसिक छळ आहे. पंजाबमधील काही शहरांमध्ये इमर्जन्सी प्रदर्शित होत नाही अशा बातम्या येत आहेत. मला सर्व धर्मांबद्दल आदर आहे. चंदीगढमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आणि तिथे लहानाचं मोठं झाल्यावर मी शीख धर्माचे बारकाईने निरीक्षण केलंय. याशिवाय अनेक गोष्टींचं पालन केलंय. परंतु सध्या सुरु असलेला विरोध हा माझी प्रतिमा खराब करण्यासाठी आणि माझ्या सिनेमाचं नुकसान करण्यासाठी पसरवलेली अफवा आहे."
कंगनाच्या 'इमर्जन्सी'ची चर्चा
कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची गेल्या वर्षभरापासून चर्चा होती. परंतु हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आणि सिनेमाचं प्रदर्शन दोन वेळा पुढे ढकलण्यात आलं. अखेर आज १७ जानेवारीला हा सिनेमा रिलीज झाला. 'इमर्जन्सी' सिनेमात कंगना राणौतने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली असून सिनेमात श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर, सतीश कौशिक यांची भूमिका आहे. सध्या सिनेमा पाहून लोक कंगनाच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.