'बाहुबली' सिनेमातील भल्लालदेव या भूमिकेने जगात लोकप्रिय मिळवलेला अभिनेता राणा दग्गुबती, अभिनेता व्यंकटेश आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हैदराबाद पोलिसांनी रविवारी साउथ अभिनेता व्यंकटेश, याशिवाय व्यंकटेश यांचा भाऊ अन् निर्माता सुरेश दग्गुबती, सुरेश यांचा मुलगा अन् अभिनेता राणा दग्गुबती याशिवाय दग्गुबती परिवारातील आणखी काही सदस्यांवर गुन्हा दाखल केलाय. काय आहे नेमकं प्रकरण?
हॉटेलची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल?
हैदराबाद येथील फिल्म नगर भागात डेक्कन हॉटेलविषयी हे प्रकरण आहे. अधिकृत रेकॉर्डनुसार, दग्गुबाती कुटुंबाने फिल्म नगर येथे त्यांची जमीन नंद कुमार या व्यक्तीला भाड्याने दिली होती. नंद कुमार हा एक व्यावसायिक असून तो त्या जागेवर डेक्कन किचन नावाचं हॉटेल चालवत होता. काही दिवसांपूर्वी नंदकुमार आणि दग्गुबती कुटुंब यांचे संपत्तीबद्दल मोठे वाद झाले. त्यामुळे कायदेशीर कारवाईही झाली.
त्यानंतर नंद कुमारने दग्गुबती परिवारावर आरोप केला की, दग्गुबती परिवाराने चोरी केली याशिवाय ज्युबली हिल्समधील प्रॉपर्टीचं नुकसान केलं. सिटी सिविल कोर्ट आणि तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाचं दग्गुबती कुटुंबाने उल्लंघन केल्याचा आरोप त्याने केलाय. दग्गुबती परिवाराने अवैधपणे प्रवेश करुन असामाजिक तत्वांची मदत घेऊन प्रॉपर्टीचं नुकसान केलं, असं नंद कुमारचं म्हणणं आहे.
कोर्टात खटला चालू असूनही दग्गुबती परिवाराने त्यांच्या माणसांच्या मदतीने २० कोटींहून अधिक रक्कम असलेल्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं. याशिवाय हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना धमकावलं. २०२२ पासून ही प्रॉपर्टी कोर्टाच्या ताब्यात असूनही दग्गुबती परिवाराने नुकसान केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. राणा-व्यंकटेश आणि दग्गुबती परिवारातील इतर सदस्यांची यामुळे चौकशी होण्याची शक्यता आहे.