कन्नड कलाविश्वातील (Kannada Cinema) प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचं cardiac arrest मुळे निधन झालं आहे. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. याविषयी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
पुनीत यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जास्त त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना ११.४० वाजता अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. यावेळी डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. पुनीत यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj S Bommai) यांनी रुग्णालयात जाऊन पुनीत यांची भेट घेतली होती.
कोण आहे पुनीत राजकुमार?
पुनीत राजकुमार हे दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध आणि मोठं नाव आहे. कन्नड चित्रपटांमध्ये त्यांचा दबदबा असून त्यांनी २९ पेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट दिले आहे. प्रसिद्ध अभिनेता राजकुमार आणि Parvathamma यांचा तो मुलगा आहे. पुनीत यांनी बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. ‘Bettada Hoovu’ असं त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं नाव होतं. हा चित्रपट १९८५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. इतकंच नाही तर त्यांना कर्नाटक राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
२००२ पासून पुनीत झाले सुपरस्टार
पुनीत यांना अप्पू या नावाने ओळखलं जातं. २००२ मध्ये त्यांना ही ओळख मिळाली. ‘अभी’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि ‘अनजनी पुत्र’ यांसारख्या चित्रपटात ते झळकले आहेत.‘Yuvarathnaa’ या चित्रपटात ते अखेरचे झळकले असून याच वर्षी त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.