एका हिंदी मालिकेच्या सेटवर मोठी आग लागून ५० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. इतकंच नव्हे तर मालिकेतील प्रमुख अभिनेता तब्बल १३ महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आजवरच्या इतिहासात घडलेली भयानक घटना म्हणून याकडे पाहिलं जातं. ही मालिका आहे 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान'. ३५ वर्षांपूर्वी या मालिकेच्या सेटवर ही घटना घडली होती. ती घटना आठवून आजही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. काय घडलं होतं नेमकं?
आगीत होरपळून अनेक लोकांचा मृत्यू
ही घटना ८ फेब्रुवारी १९८९ मधील. 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान' या मालिकेचं शूटिंग सुरु होतं. मैसूर येथील प्रिमिअर स्टुडिओमध्ये या ऐतिहासिक मालिकेचं शूटिंग सुरु होतं. मालिकेच्या सेटवर आग विझवण्याची कोणतीही उपकरणं नव्हती. अशातच मालिकेच्या सेटवर एक वायर लूज पडल्याने भलीमोठी आग लागली. सेटवर धूर बाहेर जाण्याचीही जागा नव्हती. त्यामुळे आगीचा भडका झाला. मालिकेच्या सेटवर मोठ्या लाईट्स आणि इतरही उपकरणं होती. त्यामुळे आग कमी होण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. या भयानक घटनेमुळे मोठी जीवीतहानी झाली.
या आगीत होरपळून तब्बल ६२ लोकांचा मृत्यू झाला होता. इतकंच नव्हे 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान' मालिकेतील मुख्य अभिनेता संजय खान हे आगीत भाजले गेले. त्यामुळे संजय यांना तब्बल १३ महिने हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. अभिनेत्यावर सर्जरीही करण्यात आली. मृतांच्या कुटुंबांना त्यावेळी ५ हजार रुपये देण्यात आले. अशाप्रकारे 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान' या मालिकेच्या सेटवर ही घटना घडली होती. टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात मोठी मोठी जीवितहानी घडल्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी.