सिनेविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. एका २४ वर्षीय अभिनेत्रीने समुद्रकिनारी योगा करताना तिचे प्राण गमावले आहेत. याचा भयावह व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री समुद्रकिनारी असलेल्या दगडावर बसून योगा करताना दिसत आहे. पण, तेवढ्यातच मोठी लाट येते आणि अभिनेत्री त्या लाटेबरोबर समुद्रात वाहून जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
समुद्रकिनारी योगा करताना वाहून गेलेल्या ही एक २४ वर्षांची रशियन अभिनेत्री आहे. कामिला बेल्यात्सकाया असं या अभिनेत्रीचं नाव आहे. कामिला थायलंड ट्रिपला गेली होती. त्यावेळी समुद्रकिनारी ती योगा करण्यासाठी ध्यान लावून बसली होती. पण, तेवढ्यातच काळाने तिच्यावर घाला घातला. आणि योगा करत असतानाच आलेल्या लाटेत ती वाहून गेली आणि अभिनेत्रीचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी अभिनेत्रीने या जागेबद्दल सोशल मीडियावर पोस्टही केली होती. "मला समुद्र खूप आवडतो. पण, ही जागा...हा समुद्र आणि तट आजपर्यंत मी बघितलेली सर्वात सुंदर जागा आहे", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं.
कामिला बेल्यात्सकाया तिच्या बॉयफ्रेंडसह थायलंडमध्ये फिरण्यासाठी आली होती. शुक्रवारी(२९ नोव्हेंबर) समुद्रकिनारी योगा करत असताना तिच्याबरोबर ही दुर्घटना घडली. तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांपैकी एकाच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. कामिला वाहून गेल्यानंतर एका व्यक्तीने तिला वाचवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्याला यश आलं नाही. सुरक्षा यंत्रणांकडूनही कामिलाचे प्राण वाचविण्यासाठी तातडीचे प्रयत्न केले गेले. मात्र काही तासांनंतर तिचा मृतदेह आढळला.