कुणी खरेदी करणार घर, तर कुणी कर्ज फेडणार...WPL नं महिला क्रिकेटपटूंचं आयुष्य असं बदललं! पाहा...

वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या सीझनसाठी मुंबईत लिलाव सोहळा आयोजित केला गेला होता. जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात महिला क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची बोली लागली. यात एकूण ८७ महिला क्रिकेटपटूंवर बोली लागली. ज्यात ३० परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.

भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. स्मृती हिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं ३.४० कोटी रुपयांची बोली लावत संघात दाखल करुन घेतलं.

WPL मुळे महिला खेळाडूंना एक व्यासपीठ मिळालं आहे तिथं ते आपलं खेळाचं कौशल्य सिद्ध करुन दाखवू शतात. तसंच या स्पर्धेत पैशाचा पाऊस पडत असल्यानं वैयक्तिक आयुष्यातही आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ता प्राप्त होते. याआधी आयपीएलमध्ये आपण अनेक प्रतिभावान खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागलेलं पाहिलं आहे. प्रत्येकाच्या यशाची एक अनोखी आणि प्रेरणादायी कहाणी आहे. आता महिलांच्या लीगमध्येही असंच काहीसं पाहायला मिळत आहे.

महिला क्रिकेटपटूंच्या लीगमध्ये ज्या खेळाडूंवर पैशांची बरसात झाली आहे त्यातील काही खेळाडू असे आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईची आहे. पण आता या लीगमुळे त्यांना आधार मिळाला आहे. लिलावातून मिळालेल्या पैशांनी या खेळाडूंची स्वप्न पूर्ण होणार आहेत. कुणाला स्वत: घर खरेदी करायचं आहे, तर कुणाला त्यांच्या कुटुंबावरील कर्ज फेडायचं आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष हिलाही चांगली कमाई करता आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं १.९० कोटींची बोली लावत तिला संघात दाखल करुन घेतलं आहे. आता ऋचा या पैशांनी आपल्या आई-वडिलांसाठी एक फ्लॅट घेणार आहे.

"माझ्या आई-वडिलांचं स्वप्न होतं की मी भारतासाठी खेळावं. मला माझ्या संघाचं नेतृत्व करण्याची इच्छा आहे आणि भारतासाठी एक मोठी स्पर्धा जिंकायची आहे. मला कोलकातामध्ये स्वत:चा एक फ्लॅट खरेदी करायचा आहे. माझे आई-वडील आता त्याच नव्या फ्लॅटमध्ये राहावेत. उर्वरित जीवन आनंदात व्यतित करावं", असं ऋचा घोष म्हणाली.

भारतीय संघाची फिरकीपटू राधा यादव हिला यूपी वॉरियर्सनं ४० लाखांची बोली लावून संघात दाखल केलं. राधा यादवचंही स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न आहे. जिथं तिचं कुटुंब चांगल्या पद्धतीनं राहू शकेल. आपलं स्वप्न आता पूर्ण होईल असा विश्वास राधा यादवनं व्यक्त केला आहे.

वूमन्स प्रीमियर लीग येत्या काही वर्षात महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवून आणेल असं बोललं जात आहे. सध्याच्या घडीला याची आयपीएलशी तुलना केली जाऊ शकत नाही. पण जस-जसं स्पर्धा रोमांचक होत जाईल असं या स्पर्धेची ब्रँड व्हॅल्यू देखील वाढेल. कदाचित काही वर्षांनी एखाद्या महिला क्रिकेटपटूला सॅम कुरनसारखीचं इतिहासातील सर्वाधिक बोलू लागू शकते.