विक्रमी ८०७ धावांच्या सामन्यात इंग्लंडची सरशी; विंडीजचे प्रयत्न अयपशी

WIvsENG 4th ODI : Despite Chris Gayle's 162 runs, West Indies lose 4th ODI to England by 29 runs

दोन्ही संघांनी मिळून ४६ षटकार खेचले आणि विश्वविक्रमाची नोंद केली. या कामगिरीसह इंग्लंड- वेस्ट इंडिज संघांनी २०१३ पासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या नावावर असलेला ३८ षटकारांचा विक्रम मोडला.

इंग्लंडने २४, तर वेस्ट इंडिजने २२ षटकार खेचले. याच मालिकेत वेस्ट इंडिजने एका सामन्यात २३ षटकार खेचू विश्वविक्रम केला होता. इंग्लंडने तोही आज मोडला.

जोस बटलरने १२ षटकार खेचून ७७ चेंडूंत १५० धावांचा पाऊस पाडला. मॉर्गननेही ८८ चेंडूंत १०३ धावा कुटल्या आणि इंग्लंडने ५० षटकांत ६ बाद ४१८ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडची ही वेस्ट इंडिजविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजनेही धमाका उडवला. सलामीवीर ख्रिस गेलने १४ षटकार खेचून ९७ चेंडूंत १६२ धावा कुटल्या. यासह त्याने वन डे क्रिकेटमध्ये १०००० धावांचा पल्लाही पार केला.

वन डे क्रिकेटमध्ये १०००० धावा करणारा तो एकूण १४ वा आणि वेस्ट इंडिजचा दुसरा ( ब्रायन लारानंतर) खेळाडू ठरला. ३९ वर्ष १५९ दिवसांच्या गेलने शतक ठोकून सर्वात वयस्कर शतकवीराचा मान पटकावला.

पदार्पणानंतर १०००० धावांचा पल्ला गाठण्यासाठी सर्वाधिक दिवस गेलने घेतले. त्याने ७११० दिवसात हा विक्रम केला. गेलच्या या खेळीनं विंडीजला हव्या असलेल्या रन रेटपेक्षा अधिक वेगाने धावा करून दिल्या होत्या.

पण मार्क वूड ( ४-६०) आणि सामन्याला कलाटणी देणारे रशीदचे ( ५-८५) षटक यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजला ३८९ धावांवर समाधान मानावे लागले आणि त्यांची ही सर्वोत्तम खेळी ठरली.

इंग्लंडने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

या मालिकेत आतापर्यंत ७७ षटकारांची आतषबाजी झाली आहे आणि ही षटकारांच्या बाबतीत ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१३ मध्ये झालेल्या मालिकेत १०७ षटकार लागले होते.