Ravi Shastri on Virat Kohli, IPL 2022 RCB vs LSG: "बास झालं... विराटने आता दीड-दोन महिने क्रिकेट थांबवायला हवं"; रवी शास्त्रींचे रोखठोक मत

मंगळवारच्या सामन्यात विराट पहिल्याच चेंडूवर झाला बाद

Ravi Shastri on Virat Kohli, IPL 2022 RCB vs LSG: IPL मध्ये विराट कोहलीची खराब कामगिरी अद्यापही सुरूच आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने फारशी चांगली केलेली नाही. टीम इंडियासाठी सुरू असलेला त्याचा खराब फॉर्म RCB साठी खेळतानाही सुरूच आहे. या दरम्यान, टीमचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीबाबत सडेतोड वक्तव्य केले.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहली पहिल्याच चेंडूवर शून्य धावा काढून बाद झाला. त्यानंतर रवी शास्त्री यांनी कोहलीला क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला.

एका क्रीडा वाहिनीशी बोलताना शास्त्री म्हणाले, 'जेव्हा बायो बबल पहिल्यांदा सुरू झालं, तेव्हा मी प्रशिक्षक होतो. बायो बबलमध्ये कसं वातावरण असतं, ते मी पाहिलं आहे. त्यामुळे मला स्पष्टपणे वाटतं की खेळाडूंबद्दल सहानुभूती दाखवावी लागेल."

"मी थेट मुख्य खेळाडूबद्दल बोलतो. विराट कोहली गेल्या दोन वर्षात खूप काळ क्रिकेट खेळतोय. तो आता क्रिकेट खेळून खेळून अक्षरश: कंटाळला (Overcooked) आहे. त्यामुळे जर कोणाला विश्रांतीची आवश्यकता असेल, तर तो म्हणजे विराट कोहली."

"विराट कोहलीने आताच्या घडील दीड-दोन महिने क्रिकेट सोडून द्यायला हवे. दीड किंवा दोन महिन्यांचा ब्रेक... मग तो इंग्लंड दौऱ्यानंतर असेल किंवा इंग्लंड दौऱ्यापूर्वी असेल... पण आता त्याला ब्रेकची नितांत गरज आहे."

"विराट कोहली हा एक अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्यात अजूनही किमान सहा ते सात वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे त्याला आताच इतक्या मोठ्या स्तरावर मानसिक थकवा येणं बरोबर ठरणार नाही. अशाने त्याच्यातील क्रिकेटवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे", असं सडेतोड मत रवी शास्त्रींनी व्यक्त केलं.