T20 World Cup Ind Vs SA : विराट कोहलीला खुणावतोय वर्ल्ड रेकॉर्ड; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर दिग्गजांना टाकणार मागे

T20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.

T20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सुपर 12 स्टेजमधील गट 2 च्या सामन्यात भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. उभय संघांमधील हा सामना पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. येथील विजयी संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याबरोबरच उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करेल. भारतासाठी, फलंदाजांची कामगिरी विशेषत: विराट कोहलीची कामगिरी खूप महत्त्वाची ठरणार आहे. विराट कोहलीसाठी आतापर्यंत ही स्पर्धा उत्तमच ठरली आहे.

पाकिस्तानविरुद्ध 82 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळल्यानंतर त्याने नेदरलँड्सविरुद्धही नाबाद अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटकडून अशीच खेळी अपेक्षित आहे आणि यादरम्यान त्याला विश्वविक्रम करण्याचीही संधी असेल.

विराट कोहली श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकून T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज होण्यापासून फक्त 28 धावा दूर आहे.

विराटने टी-20 विश्वचषकाच्या 21 डावांमध्ये आतापर्यंत 989 धावा केल्या आहेत. 2012 मध्ये T20 विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केल्यापासून विराटने 89.90 च्या सरासरीने आणि 132.04 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 12 अर्धशतकेही झळकावली आहेत.

विराटपेक्षा सर्वाधिक धावा केवळ जयवर्धनेने केल्या आहेत. श्रीलंकेच्या माजी कर्णधाराने 2007-14 दरम्यान 31 डावांमध्ये 39 च्या सरासरीने आणि 134.74 च्या स्ट्राईक रेटने 1016 धावा केल्या. या काळात जयवर्धनेने 1 शतक आणि 6 अर्धशतके झळकावली.

T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 मध्ये दोन भारतीय आहेत. या यादीत विराटशिवाय भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे.

रोहितने आतापर्यंत 32 डावांमध्ये 37.66 च्या सरासरीने आणि 131.01 च्या स्ट्राईक रेटने 904 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात शर्माने ६१ धावा केल्या तर तो वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला मागे टाकेल आणि सर्वाधिक धावांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.