T20 World Cup 2022: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात विश्वविक्रमासाठी रस्सीखेच, कोण मारणार बाजी?

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. आजचा सामना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे.

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने सुरूवातीचे दोन्हीही सामने जिंकून ४ गुणांसह उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि दुसऱ्या सामन्यात नेदरलॅंड्सचा पराभव केला. भारतीय संघाचा तिसरा सामना आज दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार आहे. खरं तर भारतीय संघ ग्रुप बीच्या क्रमवारीच ४ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याच्या नावावर आहे. मागील ८ वर्षांपासून एकही खेळाडू त्याचा हा विक्रम मोडू शकला नाही. परंतु यावर्षी त्याचा विक्रम एक नव्हे तर दोन भारतीय फलंदाज मोडू शकतात. भारतीय संघाने चालू विश्वचषकातील पहिले दोन सामने जिंकून शानदार सुरूवात केली आहे.

विराट कोहलीने सलामीच्या दोन्हीही सामन्यात अर्धशतकी खेळी करून महेला जयवर्धनेच्या विश्वविक्रमाकडे कूच केली आहे. जयवर्धनेने ३१ सामन्यांमध्ये १०१६ धावा केल्या आहेत. कोहली देखील श्रीलंकेच्या दिग्गजाचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. विराट सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात शानदार फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने नाबाद ८२ धावांची खेळी केली होती तर नेदरलॅंड्सविरूद्धच्या सामन्यात किंग कोहलीने नाबाद ६२ धावांची खेळी केली होती.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील जुनी लय पकडली आहे. पाकिस्तानविरूद्ध स्वस्तात माघारी परतल्यानंतर रोहितने नेदरलॅंड्सविरूद्ध अर्धशतकी खेळी पुनरागमन केले. आताच्या घडीला विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या आणि रोहित शर्मा चौथ्या स्थानी विराजमान आहे. तर ख्रिस गेल ९६५ धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

विराट कोहलीच्या नावावर आता टी-२० विश्वचषकामध्ये ९८९ धावांची नोंद आहे. तर रोहित शर्माच्या नावावर ९०४ धावा आहेत. हे दोन्ही भारतीय फलंदाज अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात किंग कोहलीने ११ धावा केल्या तर तो टी-२० विश्वचषकात १००० धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज बनेल. याशिवाय त्याने २८ धावा केल्या तर स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम करेल.

कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात या विश्वविक्रमाला गवसणी घालेल अशी अपेक्षा आहे. लक्षणीय बाब म्हणजे तो पहिल्या दोन्हीही सामन्यात बाद झाला नाही. रोहित शर्माबद्दल भाष्य करायचे झाले तर, तो ९०४ धावांसह चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय कर्णधाराने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६२ धावा केल्या तर तो या यादीत ख्रिस गेलला (९६५) मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर जाईल.

दुसरीकडे टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा विराट कोहलीच्या ८६ धावांनी आणि महेला जयवर्धने ११२ धावांनी मागे आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातून विराट कोहली विश्वविक्रम करणार का हे पाहण्याजोगे असेल. तर रोहित शर्माला देखील याच वर्षी कोहलीला मागे टाकण्याची सुवर्णसंधी असेल.