Top 5 Players, IPL Final 2022 GT vs RR: गुजरात-राजस्थान फायनलच्या सामन्यात 'या' ५ खेळाडूंवर असेल नजर

गुजरात अन् राजस्थानच्या संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत.

Top 5 Players, IPL Final 2022 GT vs RR: यंदाच्या हंगामातील अंतिम सामना आज अहमदाबाद मध्ये खेळला जाणार आहे. गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स असा हा सामना आहे. दोन्ही संघांकडे बरेच मॅचविनर खेळाडू आहेत. पाहूया आजच्या सामन्यातील Top 5 खेळाडू जे अख्खा सामना फिरवू शकतात.

राजस्थानचा जोस बटलर (Jos Buttler) हा वन-मॅन आर्मीप्रमाणे आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत बटलर आघाडीवर असून त्याने ८०० हून अधिक धावा केल्या आहेत. बटलरने यंदा ४ शतके झळकावली आहेत. क्वालिफायर-2 मध्ये बटलरने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता.

गुजरातचा मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मिलर (David Miller) हा 'गेम चेंजर' खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूने क्वालिफायर-1 मध्ये राजस्थानच्या प्रसिद्ध कृष्णाने सलग तीन षटकार मारून सामना जिंकला. मिलरने ३८ चेंडूत ६८ धावा केल्या. या दरम्यान त्याने ५ षटकार मारले. मिलरने या हंगामात १५ सामन्यांमध्ये सर्वाधिक ४४९ धावा केल्या आहेत.

राजस्थान संघासाठी ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) , ओबेड मॅकॉय हे एकत्र गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत. पण चहलने सर्वात जास्त प्रभाव पाडला आहे. तो केव्हाही झटपट विकेट घेऊन खेळाला कलाटणी देण्याची क्षमता राखतो. या मोसमात चहलने आतापर्यंत २६ बळी घेतले असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. चहलने यंदाच्या हंगामात एक हॅटट्रिकदेखील घेतली आहे.

गुजरातचा अष्टपैलू राहुल तेवातिया (Rahul Tewatia) हा संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. तो चेंडूसोबतच बॅटनेही अप्रतिम कामगिरी करताना दिसला आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या तेवतियाने अनेक प्रसंगी सामना फिरवला आहे. RCB विरुद्ध २५ चेंडूत नाबाद ४३ आणि हैदराबादविरुद्ध २१ चेंडूत नाबाद ४० धावा खेळून त्याने दोन सामने जिंकवून दिले होते. तसेच, २ चेंडूत १२ धावांची गरज असताना त्याने पंजाबविरूद्ध दोन षटकारही लगावले होते.

राजस्थान संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा (Prasidh Krishna) यंदाच्या हंगामात आपल्या गोलंदाजीने प्रभाव पाडताना दिसत आहे. त्याने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी कंजुष गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या आहेत. त्याने क्वालिफायर-२ मध्ये बंगलोरविरुद्ध २२ धावांत ३ बळी घेतले. तसेच, लखनौ संघाविरुद्ध २ विकेट्स घेत संघाला महत्त्वाचा विजय मिळवून दिला होता.