IPL मध्ये १५ वर्षात या खेळाडूंनी केली सर्वाधिक कमाई; धोनी-कोहली नाही, तर यानं कमावले १७८ कोटी

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) १६ वा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होत आहे. पण आतापर्यंतच्या आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक कमाई करणारे १० खेळाडू कोण हे आपण पाहू.

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) १६ वा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच T20 लीगमध्ये १० संघ खेळताना दिसतील. आयपीएल एक असं व्यासपीठ आहे जिथे खेळाडूंना केवळ प्रसिद्धीच मिळत नाही तर त्यांच्यावर पैशांचा पाऊसही पडतो.

आयपीएलमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंचा विचार केला तर, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी यासारखे दिग्गज खेळाडू या यादीत आघाडीवर आहेत. आतापर्यंत सात खेळाडूंनी आयपीएलमध्ये १०० कोटी किंवा त्याहून अधिक कमाई केली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-१० खेळाडूंवर एक नजर टाकूया.

रोहित शर्मा - स्टार फलंदाज रोहित शर्मा हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार तसेच सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. महेंद्रसिंग धोनीला मागे टाकून आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत रोहित अव्वल स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराची आयपीएलची कमाई जवळपास १७८ कोटी रुपये आहे. रोहितने आतापर्यंत २२७ आयपीएल सामन्यांमध्ये ३०.३० च्या सरासरीने ५८७९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं एक शतक आणि ४० अर्धशतकं झळकावली आहेत.

एमएस धोनी - चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आयपीएलच्या पहिल्या सत्रातील लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला पहिल्यांदा ६ कोटी रुपये मिळाले होते. त्यानंतर २०११ मध्ये ८.२८ कोटी रुपये, २०१४ मध्ये १२.५ कोटी रुपये आणि २०१८ मध्ये १५ कोटी रुपये मिळाले. आयपीएल २०२३ मध्ये धोनीला १२ कोटी रुपये मिळाले आहेत आणि त्यानं आयपीएलमधून सुमारे १७६ कोटी रुपये कमावले आहेत. ४१ वर्षीय एमएस धोनीनं आतापर्यंत २३४ आयपीएल सामन्यांमध्ये ३९.२० च्या सरासरीनं ४९७८ धावा केल्या आहेत, ज्यात २४ अर्धशतकांचा समावेश आहे.

विराट कोहली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये १७३ कोटी रुपये कमावले आहेत. या यादीतील तो एकमेव भारतीय आहे ज्याने कधीही इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले नाही. विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आरसीबीच्या या माजी कर्णधारानं आतापर्यंत २२३ आयपीएल सामन्यांमध्ये ३६.२० च्या सरासरीनं ६६२४ धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर आयपीएलमध्ये ५ शतके आणि ४४ अर्धशतकांची नोंद आहे.

सुरेश रैना (२००८ ते २०२१): 'मिस्टर IPL' म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना या T20 लीगमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक होता. रैनाने एकूण २०५ सामन्यात ५५२८ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. रैनाने २००८ ते २०१९ या काळात प्रत्येक मोसमात ३०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या, हा एक विक्रम आहे. रैनाने आयपीएलमधून ११० कोटी रुपये कमावले.

रवींद्र जडेजा : आयपीएल सुरू झाला तेव्हा रवींद्र जडेजा अनकॅप्ड खेळाडू होता. आयपीएलच्या सुरुवातीच्या सीझनच्या लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने १२ लाख रुपयांना विकत घेतलं. जडेजानं या लीगमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्याची सॅलरीही वाढली. आतापर्यंत जडेजाची आयपीएलमधील एकूण कमाई १०९ कोटी रुपये आहे. डावखुऱ्या अष्टपैलू रवींद्र जडेजानं आयपीएलमध्ये आतापर्यंत २१० सामने खेळून २५०२ धावा केल्या आहेत. यासोबतच त्यानं १३२ विकेट्सही घेतल्या आहेत.

सुनील नरेन (२०१२ ते २०२३): सुनील नरेन २०१२ च्या हंगामापासून KKR संघाचा एक भाग आहे. कॅरेबियन स्टार नरेनचा सुरुवातीची सॅलरी ३.५१ कोटी रुपये होती. त्यानंतर २०१८ ते २०२१ पर्यंत प्रत्येक हंगामात त्यानं १२.५ कोटी रुपये कमावले, परंतु २०२२ मध्ये ही रक्कम ६ कोटींवर आली. त्याची आयपीएलमधील एकूण कमाई १०७ कोटी रुपये आहे. नरेनने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १४८ सामने खेळले असून त्यामध्ये २५.१३ च्या सरासरीन १५२ विकेट्स घेतल्या आहेत. नरेननं १०२५ धावा फटकावत फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिलं आहे.

एबी डिव्हिलियर्स (२००८-२०२१): एबी डिव्हिलियर्सन आयपीएल २०२१ संपल्यानंतर निवृत्ती घेतली. 'मिस्टर ३६० डिग्री' म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्सचा आयपीएलची सुरुवातीची पगार १.२ कोटी रुपये होती, परंतु सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीमुळे त्यात वाढ होत गेली. डिव्हिलियर्सने सुमारे १०२ कोटी रुपये कमावले. आफ्रिकन अनुभवी डिव्हिलियर्सनं १८४ आयपीएल सामन्यांमध्ये ३९.७० च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या, ज्यात ३ शतकं आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे.

गौतम गंभीर (२००८-२०१८): डावखुरा फलंदाज गौतम गंभीरनं १५४ सामन्यांमध्ये ४२१७ धावा केल्या. २००८ मध्ये गौतम गंभीरन दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत २.९ कोटी रुपयांचा करार केला होता. त्यानंतर IPL २०११ च्या लिलावात गंभीरला कोलकाता नाईट रायडर्सने ११.०४ कोटींना विकत घेतले. केकेआरकडून खेळताना गंभीर खूप यशस्वी ठरला आणि त्याने आपल्या संघाला दोनदा चॅम्पियन बनवलं. २०१८ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी गंभीरनं आयपीएलमधून सुमारे ९४ कोटी रुपये कमावले.

शिखर धवन : डावखुरा फलंदाज शिखर धवन प्रत्येक आयपीएल हंगामात सहभागी झाला आहे. आयपीएल २००८ मध्ये त्याचा दिल्ली कॅपिटल्सशी १२ लाख रुपयांचा करार होता. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे यात वाढ होत गेली. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनचं आयपीएलची आतापर्यंतची कमाई सुमारे ९१ कोटी रुपये आहे. धवननं आतापर्यंत २०६ आयपीएल सामन्यांमध्ये ३५.०८ च्या सरासरीने ६२४४ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि ४७ अर्धशतकांचा समावेश आहे.

दिनेश कार्तिक : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. कार्तिकची आयपीएलमधील आतापर्यंतची कमाई ८६ कोटी इतकी आहे. दिनेश कार्तिकने २२९ आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं २६.८५ च्या सरासरीनं ४३७६ धावा केल्या. यादरम्यान दिनेश कार्तिकनं एकूण २० अर्धशतकं झळकावली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९७ धावा होती.