एकेकाळी स्टार खेळाडू असणाऱ्या 'या' ५ जणांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली; संघात मिळत नाहीय संधी...!

टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा सातत्याने वाढत आहे, अशा परिस्थितीत युवा आणि वरिष्ठ खेळाडूंना सातत्याने चमकदार कामगिरी करत राहावे लागेल.

टीम इंडियाचे खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त आहेत. विराट कोहली, रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. दुसरीकडे उमरान मलिक, मोहम्मद सिराज, शुबमन गिल यांनीही अलीकडच्या काळात जबरदस्त खेळ दाखवला आहे. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा सातत्याने वाढत आहे, अशा परिस्थितीत युवा आणि वरिष्ठ खेळाडूंना सातत्याने चमकदार कामगिरी करत राहावे लागेल.

टीम इंडियातील असे काही खेळाडू आहेत जे एकेकाळी संघाचे स्टार परफॉर्मर असायचे, परंतु वाढत्या स्पर्धेमुळे त्यांना संघात स्थान मिळवणे कठीण झाले आहे. तसेच या खेळाडूंना आंतराष्ट्रीय सामने खेळून बराच काळ लोटला आहे. अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांचे आंतरराष्ट्रीय करिअर जवळपास संपले आहे.

मनीष पांडेने 2015 साली झिम्बाब्वेविरुद्ध वनडे आणि टी-20 मध्ये पदार्पण केले. 33 वर्षीय मनीष पांडेने भारतासाठी 29 एकदिवसीय सामन्यांमध्ये 566 धावा आणि 39 टी-20 सामन्यांमध्ये 709 धावा केल्या आहेत. मनीष पांडेने 23 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

दोन वर्षांआधी इशांत शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य असायचा, पण आता त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही एक प्रकारे संपुष्टात आली आहे. इशांत शर्माने भारतासाठी 105 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले आहेत. इशांतने कसोटीत 311, एकदिवसीय सामन्यात 115 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. त्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. भारतीय संघ आता युवा वेगवान गोलंदाजांना संधी देत ​​असल्याने 34 वर्षीय इशांत शर्माचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही.

अजिंक्य रहाणेने भारतासाठी 82 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले आहेत. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत केले तेव्हा त्याच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक झाले होते. पण तेव्हापासून बरेच काही बदलले आहे. रहाणे आता टीम इंडियातून बाहेर आहे. रहाणेने गेल्या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार खेळ करत असून चालू मोसमात त्याने पाच रणजी सामन्यांत ७६ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या आहेत. असे असूनही, तो नजीकच्या भविष्यात निवडकर्त्यांचा विश्वास जिंकू शकला नाही.

महेंद्रसिंग धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर ऋद्धिमान साहाला यष्टिरक्षक म्हणून अनेक संधी मिळाल्या. तथापि, ऋषभ पंत नंतर संघात सामील झाल्यानंतर रिद्धिमान साहाची कारकीर्द उतरणीला लागली. वृध्दिमान साहा शेवटचा सामना २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो बाहेर आहे. 40 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळलेला वृद्धिमान साहा 38 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपली आहे.

वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त फक्त करुण नायरने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी त्रिशतक झळकावले. मात्र, त्या त्रिशतकानंतर नायरचा आलेख वर येण्याऐवजी खालीच गेला. करुण नायर 2017 मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. 31 वर्षीय करुण नायरने भारतासाठी सहा कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.