Team India New Captain: राहुल की पंत, टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार कोण?; BCCI नं सांगितलं...

Team India New Captain: भारतीय संघ वेस्ट इंडिजनंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला सामोरा जाणार आहे. यासाठीच्या कसोटी संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, विराट अन् रोहितनंतर भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार कोण असेल याबाबतही महत्वाचं विधान केलं आहे.

श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येत असून तीन ट्वेन्टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठीच्या भारतीय संघाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) केली. बीसीसीआयनं क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आता रोहित शर्माच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. तसंच बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधारावरही भाष्य करण्यात आलं आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, यष्टीरक्षक रिषभ पंत आणि गोलंदाज शार्दुल ठाकूर यांना ट्वेन्टी-२० मालिकेसाठी आराम देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या निवडसमतीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.

चेतन शर्मा यांनी याच पत्रकार परिषदेत रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार कोण असेल याबाबतही बीसीसीआय़ची भूमिका स्पष्ट केली आहे. यासाठी बीसीसीआयकडून सातत्यानं तीन खेळाडूंची चाचपणी केली जात असल्याचं चेतन शर्मा म्हणाले.

जसप्रीत बुमराह, केएल राहुल किंवा रिषभ पंत भारतीय संघाची धुरा भविष्यात हाती घेऊ शकतात असं चेतन शर्मा यांनी सांगितलं. या तिन्ही खेळाडूंना रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली स्वत:मधील गुणांची पारख करणं महत्वाचं आहे. तसंच क्रिकेट बोर्ड देखील यासाठी मेहनत घेत आहे, असं चेतन शर्मा म्हणाले.

वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात द.आफ्रिका दौऱ्यात वनडे सीरिजसाठी केएल राहुल याची भारतीय संघाचं कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. तर जसप्रीत बुमराह याच्याकडे उपकर्णधार पद देण्यात आलं होतं. या सीरिजमध्ये भारतीय संघाचा ३-० ने पराभव झाला होता.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्माचं कर्णधारपदी पुनरागमन झालं आहे. अशातच जसप्रीत बुमराह याला विश्रांती देऊन रिषभ पंत याच्याकडे संघाचं उपकर्णधारपद सोपविण्यात आलं. तर केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या ट्वेन्टी-मालिकेत भारतीय संघाकडे २-० अशी आघाडी आहे.

विंडीजनंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसा सामोरा जाणार आहे. यात ३ एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. यासाठी रोहित शर्माची कर्णधार आणि जसप्रीत बुमराह याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. अशापद्धतीनं बीसीसीआयकडून संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि रिषभ पंत यांची तयारी करुन घेतली जात आहे.

केएल राहुल आयपीएलमध्ये यावेळी लखनौ सुपरजाएंट्स संघाचं नेतृत्त्व करताना पाहायला मिळणार आहे. गेल्या सीझनमध्ये केएल राहुलके पंजाब किंग्ज संघाचं कर्णधारपद होतं. तर रिषभ पंत गेल्या दोन सीझनपासून दिल्ली कॅपिटल्स संघाचं कर्णधारपद सांभाळत आहे. तर बुमराहकडे कर्णधारपदाचा कोणताही अनुभव अद्याप नाही.