T20 World Cup, India Playing XI against Pakistan : सराव सामन्यात टीम इंडिया झाली पास, पण प्रत्यक्ष युद्धात कोण असतील अंतिम ११ शिलेदार?, जाणून घ्या

T20 World Cup, India probable Playing XI against Pakistan : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दोन्ही सराव सामन्यांत विजय मिळवला. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत टीम इंडियानं १८९ धावांचे लक्ष्य १९व्या षटकात, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५३ धावांचे लक्ष्य १८व्या षटकात पार केले.

भारतीय फलंदाजांच्या कामगिरीला तोडच नाही. लोकेश राहुलचे सातत्य अन् त्याला इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्याकडून मिळणारी साथ यातून टीम इंडियाची फलंदाजी किती मजबूत आहे हे समजते. गोलंदाजीत काही उणीवा आहेत, पण त्या दूर होतील अशी अपेक्षा आहे.

टीम इंडियानं पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडनं उभं केलेलं ५ बाद १८८ धावांचे लक्ष्य सहज पार केले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या इशान किशन व लोकेश राहुल या जोडीनं दमदार खेळ केले. इशाननं ४६ चेंडूंत ७० धावा केल्या, तर लोकेशनंही २४ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीत प्रचंड आत्मविश्वास व निडरपणा होता आणि हाच भारताच्या फायद्याचा ठरला.

इंग्लंडविरुद्ध मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांना अपयश आलं. भुवनेश्वर कुमारनं ४ षटकांत ५४ धावा दिल्या. मोहम्मद शमीनं तीन विकेट्स घेतल्या, परंतु त्यानंही ४० धावा दिल्या. राहुल चहरच्या ४ षटकांत ४३ धावा आल्या. आर अश्विन व जसप्रीत बुमराह हे फायद्याचे ठरले. हार्दिक पांड्याच्या रुपानं संघात सहावा गोलंदाज होता, पण तो फक्त कागदावरच दिसला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही आर अश्विननं कंजूस गोलंदाजी केली. त्यानं २ षटकांत ८ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार ( २७) व राहुल चहर ( १७) यांच्या गोलंदाजीत सुधारणा दिसली. रवींद्र जडेजा व शार्दूल ठाकूर यांनी १०च्या सरासरीनं धावा दिल्या. हार्दिक पांड्याच्या बचावासाठी विराट कोहलीनं २ षटकं फेकली, पण हा तात्पुरता पर्याय झाला.

फलंदाजीत पुन्हा एकदा लोकेश राहुलनं ( ३९) सातत्य राखलं. रोहित शर्मानं ४१ चेंडूंत ६० धावा केल्या, तर सूर्यकुमारनं नाबाद ३८ धावा केल्या. हार्दिक पांड्यानं मिळालेल्या संधीत झटपट १४ धावा केल्या. पण, त्याचं गोलंदाजी न करणं संघाला मारक ठरू शकतं. पाकिस्तानविरुद्ध तो गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे, पण जर त्यासाठी तो तयार नसेल, तर शार्दूल ठाकूरला खेळवाले लागेल.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. आयपीएल २०२१तील १३ सामने येथे खेळवले गेले आणि त्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं ९, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं ४ सामने जिंकलेत. त्यामुळे नाणेफेकीचा कौलही तितका महत्त्वाचा ठरणार आहे.

ही खेळपट्टी कधी कोणाला साथ देईल, याचा नेम नाही. आयपीएलमध्ये हर्षल पटेल, जेसन होल्डर व जसप्रीत बुमराह या जलदगती गोलंदाजांनी इथे छाप पाडलीय, तर रवी बिश्नोईसारख्या फिरकीपटूनंही येथेच कमाल केलीय. त्यामुळे टीम इंडियाला संघ निवडताना याचाही विचार करावा लागणार आहे.

गेली १० वर्ष पाकिस्तान यूएईतच आंतरराष्ट्रीय सामने खेळतोय. दुबईत पाकिस्ताननं २५ पैकी १४ सामने जिंकले आहेत. भारतानं येथे एकही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही आणि त्यामुळे पाकिस्तानची बाजू वरचढ ठरू शकते. पण, आयपीएलचा अनुभव टीम इंडियाच्या कामी येऊ शकतो.

पाकिस्तानविरुद्ध भारत फलंदाजांची तगडी फौज घेऊन मैदानावर उतरेल. लोकेश राहुल व रोहित शर्मा ही जोडी सलामीला असेल, तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे विराट कोहली व सूर्यकुमार यादव असेल. इशान किशन, रिषभ पंत हे नंतर आहेतच.

आता अतिरिक्त अष्टपैलू खेळवायचा की हार्दिक पांड्याला फक्त फलंदाज म्हणून संघात ठेवायचे, हा चर्चेचा विषय आहे. हार्दिक अजूनही गोलंदाजी करत नाहीए. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार या अनुभवी त्रिकुटावर अधिक जबाबदारी असेल.

हार्दिकच्या जागी शार्दूल ठाकूर हा पर्याय आता संघात आहे. आर अश्विन व रवींद्र जडेजा यापैकी एकालाच संधी मिळणार आहे. पण, जर हार्दिक खेळला तर भारताला सहाव्या गोलंदाजाची उणीव प्रकर्षानं जाणवेल हे निश्चित.

असा असू शकतो संभाव्य संघ - लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या/शार्दूल ठाकूर, आर अश्विन/रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार/वरुण चक्रवर्थी

Read in English