T20 World Cup, IND vs ENG: पराभवानंतर संघात फेरबदल; सिनियर खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता, रोहितचाही समावेश?

T20 World Cup, IND vs ENG: इंग्लंडच्या सालमीवीरांनी भारताला स्पर्धेबाहेर फेकले आणि 15 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न अधुरे राहिले.

T20 विश्वचषक-2022 च्या उपांत्य फेरीत आज टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. अ‍ॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट फॅन्स अत्यंत निराश झाले आहेत. कारण, या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय संघाला तब्बल 9 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. एडिलेडवर मोठ्या संख्येने भारतीय फॅन्स उपस्थित होते आणि हार्दिक त्यांना चिअर करण्यासाठी उत्साहित करत होता. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि स्टेडियमवर एकच जल्लोष दिसला. पण, इंग्लंडच्या फलंदाजांनी त्यांना गप्प केले. इंग्लंडच्या सालमीवीरांनी भारताला स्पर्धेबाहेर फेकले आणि 15 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न अधुरे राहिले.

भारताच्या या पराभवानंतर आता टी-20 संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. टी-20 संघात असलेल्या सिनियर खेळाडूंना आता बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, फिरकी गोलंदाज आर. अश्विन, दिनेश कार्तिक आणि फलंदाज विराट कोहलीचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. तसेच रोहित आणि विराटला भविष्यात टी-20 सामने खेळायचे की नाही, हा निर्णय त्यांनाच घ्यायला बीसीसीआयकडून सांगितले जाऊ शकते.

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, बीसीसीआय कधीही कोणालाही निवृत्ती घेण्यास सांगत नाही. हा वैयक्तिक निर्णय असतो. पण हो, 2023 मध्ये मर्यादित टी-20 सामने खेळले जातील. त्यामुळे बहुतेक सिनियर खेळाडू वनडे आणि कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रित करतील. पुढच्या वर्षी तुम्हाला बहुतेक सीनियर खेळाडू ट्वेंटी-20 खेळताना दिसणार नाहीत.

तथापि, जेव्हा पीटीआयने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोहली आणि रोहितसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, बदलांबद्दल आताच बोलणे उचित नाही.

बीसीसीआय 2024मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला आतापासूनच लागली आहे. त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे नव्या कर्णधाराची निवड... त्याची सुरुवात न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या ट्वेंटी-20 संघातूनच झाली आहे.

रोहितच्या जागी आता हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. ही निवड केवळ न्यूझीलंड दौऱ्याकरीता नाही, तर भविष्यासाठीही होऊ शकते. काही कठोर निर्णय घ्यावेच लागणार आहेत. जखम अधिक गंभीर होण्याआधी त्यावर उपचार गरजेचे आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी संघाला बरेच दिवस आधी पाठवले होते, असं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने InsideSport कडे बोलताना सांगितले.