T20 World Cup 2021: NZ vs ENG मॅचदरम्यान असं काय झालं की ट्रेंड होऊ लागला महेंद्रसिंह धोनी

T20 World Cup मध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध इग्लंड मॅचदरम्यान अचानक महेंद्रसिंह धोनी हा ट्विटरवर ट्रेंड करू लागला होता.

T20 World Cup 2021: टी २० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनकच राहिली. भारतीय संघानं अखेरचे तीन सामने जिंकले असले तरी त्यांना सेमीफायनलमध्ये जाण्यास अपयश आलं. सुरूवातीचे दोन सामने गमावल्यानंतरच भारतीय संघाच्या पुढील वाटचालीच्या अपेक्षा मावळल्या होत्या.

असं असलं तरी बुधवारी पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल सामन्यादरम्यान असं काही झालं की त्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला होता.

न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटू सायमन ड्यूलनं कमेंट्रीदरम्यान एका विशेष गोष्टीसाठी धोनीच्या नावाचा उल्लेख केला. याची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं इंग्लंडविरोधात पाच विकेंटनं जबरदस्त विजय मिळवला होता.

"जितकं पुढे तुम्ही मॅच घेऊन जाता जसं द ग्रेट एमएस धोनीनं सांगितलंय की जेव्हा मॅच तुम्ही एक फलंदाज म्हणून पुढेपर्यंत नेता, गोलंदाजावर तितकाच दबाव येतो," असं मॅच दरम्यान कमेंट्री करताना सायमन डूलनं सांगितलं.

डूलच्या या कमेंट्रीची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर एमएस धोनी सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला होता. १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा महेंद्रसिंह धोनी हा बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जातो.

अनेकदा त्यानं आपल्या हिंमतीवर टीम इंडियाला अखेरच्या क्षणी विजय मिळवून दिला आहे. अखेरपर्यंत मॅच खेचण्यात धोनी हा माहिर होता. अनेकदा त्यानं टीम इंडियाला क्रिजवर राहून विजयापर्यंतही पोहोचवलं आहे.

न्यूझीलंडनं २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाचा वचपा काढला. उपांत्य फेरीच्या या सामन्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. किवींचे दोन प्रमुख फलंदाज अवघ्या १३ धावांवर माघारी परतले, त्यानंतर १६व्या षटकांपर्यंत इंग्लंडनं सामन्यावर मजबूत पकड घेतली होती.

पण, जिमि निशॅमनं १७व्या षटकात ख्रिस जॉर्डनला २६ धावा चोपल्या आणि दडपड कमी केलं. १८व्या षटकात विजयासाठी २० धावा हव्या असताना निशॅम झेलबाद झाला अन् इंग्लंडचे चाहते खूश झाले. पण, अर्धशतकी खेळी करणाऱ्या डॅरील मिचेलनं सामना संपवला.

केन विलियम्सननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जेसन रॉयच्या जागी इंग्लंडनं आज सॅम बिलिंगला संधी दिली, परंतु सलामीला जॉनी बेअरस्टो व जॉस बटलर ही जोडी आली. किवी कर्णधार विलियम्सनच्या अफलातून कॅचनं ही जोडी तोडली. सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अॅडम मिल्नेनं किवींना पहिले यश मिळवून दिले, विलियम्सननं मिड ऑफला बेअरस्टोचा ( १३) भन्नाट कॅच घेतला.

मिल्नेनं धक्का दिल्यानंतर इश सोढीनं इंग्लंडचा दुसरा सलामीवीर जॉस बटलरला पायचीत केलं. डेविड मलाननं ३० चेंडूंत ४१ धावा कुटल्या. मोईन अलीनं फटकेबाजीला करतानाला मलानसह तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या.

अली व लिएम लिव्हिंगस्टोननं धावांचा वेग वाढवताना चौथ्या विकेटसाठी २३ चेंडूंत ४० धावा कुटल्या. अलीनं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. अली ३७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडनं ४ बाद १६६ धावा केल्या.

न्यूझीलंडनं ५ विकेट व १ षटक राखून सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. मिचेल ४८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या. किवी प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणार आहेत.