"ज्या भारतीय क्रिकेटने तुम्हाला पैसा, प्रसिद्धी, ओळख दिली; किमान त्याच्याशी प्रामाणीक रहा"

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बऱ्याच हालचाली सुरू आहेत... इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी करंडक स्पर्धेकडे काणा डोळा केला. कर्णधार रोहित शर्माने चौथ्या कसोटीनंतर अशा वृत्तीवर अप्रत्यक्ष टीका केली आणि त्यावर आता महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी संताप व्यक्त केला.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, BCCI सचिव जय शाह यांच्याकडून खेळाडूंना वारंवार देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला गेला. पण, इशान व श्रेयस यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता बीसीसीआय या दोन खेळाडूंना केंद्रीय करारातून वगळणार असल्याची चर्चा आहे आणि पुढे असे प्रकार घडू नये, यासाठी BCCI कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये वाढ करण्याचा व विशेष बोनस देण्याचा विचार करत आहे.

''ज्यांना क्रिकेटची भूक आहे, आम्ही त्यांनाच संधी देणार,''असे रोहित शर्मा चौथ्या कसोटीनंतर म्हणाला होता. त्याने पुढे म्हटले की, ज्यांना भूकच नाही त्यांना संधी देण्यात काय अर्थ...

सुनील गावस्कर यांनी रोहितच्या या विधानावर सहमती दर्शवली. ''ज्या क्रिकेटने तुम्हाला पैसा, प्रसिद्धी आणि ओळख दिली, त्याच्याशी प्रामाणिक राहायला हवं,'' असं ते म्हणाले. “त्याचे म्हणणे अगदी बरोबर आहे. ज्यांना कसोटी क्रिकेट खेळायचे आहे, तुम्ही त्यांच्याकडे बघा. हे मी वर्षानुवर्षे सांगत आहे. भारतीय क्रिकेटमुळे खेळाडू आहेत. ते आयुष्याच्या आणि करिअरच्या ज्या टप्प्यावर आहेत, ते सर्व भारतीय क्रिकेटमुळेच आहे. त्यांना जो पैसा, प्रसिद्धी आणि ओळख मिळाली, ती भारतीय क्रिकेटमुळेच. त्यामुळे तुम्हाला भारतीय क्रिकेटबद्दल निष्ठा दाखवावी लागेल,” असे गावस्कर स्पोर्ट्स तकवर म्हणाले.

“आणि जर तुम्ही ते कोणत्याही कारणास्तव निष्ठा दाखवत नसाल आणि 'मी खेळणार नाही, खेळणार नाही' असे म्हणत असाल, तर ज्यांना भूक लागली आहे, जे प्रयत्न करायला तयार आहेत, त्यांच्याबद्दल रोहितचे म्हणणे बरोबर आहे. ज्या खेळाडूंना खरंच भूक आहे, त्यांना संधी देण्याची निवड समितीची वृत्ती असेल तर ते भारतीय क्रिकेटसाठी चांगलेच असेल. यापूर्वी बऱ्याच खेळाडूंना निवडले जायचे, आता ते होणार नाही,” असेही गावस्कर पुढे म्हणाले.

“कदाचित त्यांनी भारतासाठी कसोटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला असेल. त्यांच्यात क्षमता नाही, रोहितने म्हटल्याप्रमाणे भूकही नाही. मग ते कोणत्या प्रकारचे देशांतर्गत क्रिकेट खेळले नाहीत? जर तुम्ही रणजी करंडक खेळला नसाल तर तुम्ही काहीही करू शकत नाही,” अशीही टीका गावस्कर यांनी केली.