Stats : दक्षिण आफ्रिकेचा विश्वविक्रम; क्विंटन डी कॉकनेही मोडला १६ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड

ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : श्रीलंका (४२८), ऑस्ट्रेलिया ( ३११), इंग्लंड ( ३९९) यांच्यानंतर आज दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि ५ बाद ३८२ धावांचा डोंगर उभा केला. क्विंटन डी कॉकने ( १७४ ) तिसऱ्या शतकाची नोंद केली, तर हेनरिच क्लासेन ( ९०) याने पुन्हा वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले.

डी कॉकने शतक पूर्ण करताना दक्षिण आफ्रिकेकडून वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक शतकांच्या विक्रमात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. हे त्याचे वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे शतक ठरले आणि त्याने हर्षल गिब्स, हाशिम आमला व फॅफ ड्यू प्लेसिस ( प्रत्येकी २ शतकं) यांना मागे टाकले. ४ शतकांसह एबी डिव्हिलियर्स अव्वल आहे.

वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात ३ शतकं झळकावणारा डी कॉक पाचवा फलंदाज ठरला. मार्क वॉ ( १९९६), सौरव गांगुली ( २००३), मॅथ्यू हेडन ( २००७), डेव्हिड वॉर्नर ( २०१९) यांनी असा पराक्रम केला आहे. रोहित शर्मा ( २०१९) ५ शतकांसह टॉपर आहे.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी इनिंग्जमध्ये २० शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांत डी कॉक ( १५०) चौथ्या क्रमांकावर आला आहे. हाशिम आमला ( १०८), विराट कोहली ( १३३), डेव्हिड वॉर्नर ( १४२) हे आघाडीवर आहेत. डी कॉकने आज एबी डिव्हिलियर्स ( १७५), रोहित शर्मा ( १८३), रॉस टेलर ( १९५) व सचिन तेंडुलकर ( १९७) यांचा विक्रम मोडला.

वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाजांत डी कॉकने आज अॅडम गिलख्रिस्टला ( १४९ धावा वि. श्रीलंका, २००७) मागे टाकले. डी कॉकने आज १४० चेंडूंत १५ चौकार व ७ षटकारांसह १७४ धावांची खेळी केली. क्विंटनने १६ वर्षांपूर्वीचा हा विक्रम मोडला.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ८ वेळा ३५०+ धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आज दक्षिण आफ्रिकेच्या नावावर नोंदवला गेला आहे. ऑस्ट्रेलियाने ७ आणि भारताने ४ वेळा असा पराक्रम केला आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून वैयक्तिक धावसंख्येत क्विंटनने आज १७४ धावांसह दुसरे स्थान पटकावले. गॅरी कर्टसन यांनी १९९६मध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध नाबाद १८८ धावा केल्या होत्या. क्विंटन डी कॉकने आज एबी डिव्हिलियर्सचा ( १६२* वि. वेस्ट इंडिज, २०१५) विक्र मोडला.