Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL 2nd Test: विराट नव्हे तर 'या' खेळाडूकडून रोहित शर्मा मैदानावर घेतो सल्ला! हिटमॅनने स्वत:च दिली माहिती, 'त्या' खेळाडूचं केलं तोंडभरून कौतुक

रोहितने सामन्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केला खुलासा

Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL 2nd Test: भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्ध टी२० पाठोपाठ कसोटी मालिकाही जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने लंकेला २-० असं पराभूत केलं. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग १५ आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. रोहितला मैदानात एका खेळाडू खूप मदत होते पण तो विराट नसून कोणी वेगळाच खेळाडू असल्याचं रोहितने स्वत: सांगितलं.

दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने दणकेबाज कामगिरी केली. गुलाबी चेंडूची दिवसरात्र कसोटी असल्याने गोलंदाजांना मदत मिळणारं पिच होतं. पण तरीही श्रेयस अय्यरने पहिल्या डावात ९२ आणि दुसऱ्या डावात ६७ धावा काढत सामनावीराचा किताब पटकावला.

भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत यानेही अप्रतिम पराक्रम गाजवला. पहिल्या कसोटीत दमदार ९६ धावांची खेळी आणि दुसऱ्या कसोटीत सर्वात जलद अर्धशतक असा कारनामा त्याने केला. मालिकेच्या तीन डावात १८५ धावा करणाऱ्या पंतला मालिकावीराच्या किताबाने गौरविण्यात आले.

श्रीलंकेला साडेचारशेनजीक धावांचे आव्हान पेलवणार नव्हते अशी आशा साऱ्यांनाच होती. पण कर्णधार दिमुथ करूणरत्ने याने झुंज देत शतक ठोकलं. तरीही आपल्या अनुभवाच्या बळावर आर अश्विनने दुसऱ्या डावात सर्वाधिक चार बळी घेत संघाला विजय मिळवून दिला.

दमदार विजयानंतर रोहित शर्माने संघातील अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा रिषभ पंत याचं तोडंभरून कौतुक केलं. "रिषभ पंतला खेळाची सर्वात उत्तम समज आहे कारण तो यष्ट्यांमागे उभा असतो", असं रोहित म्हणाला.

"यष्टीरक्षण करणं हे चॅलेंज असतंच पण त्यासोबत खेळ समजून घेणं, चेंडू कसा हरकत करतो ते समजणं हेदेखील आव्हानात्मक असतं. ते रिषभ नीट जमतं. चेंडू कसा स्विंग होतोय, किती स्पिन होतोय, किती बाऊन्स होतोय हे आम्हा फलंदाजांना रिषभकडूनच समजतं. आम्ही मैदानावरच याचा अंदाज घेत असतो", असं हिटमॅनने सांगितलं.

"रिषभ पंत हा IPL मध्ये दिल्लीचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याला खेळ कसा समजून घ्यायचा ते माहिती आहे. मी अनेकदा सामन्यामध्ये त्याच्याकडून सल्ला घेत असतो. फलंदाज नक्की कसा खेळतोय? त्याची स्ट्रॅटेजी काय? तो कोणत्या ठिकाणी बचावात्मक होतोय? अशा विविध गोष्टींचा अंदाज मला रिषभ देतो", अशा शब्दात रोहितने त्याचं कौतुक केलं.