Rohit Sharma Pakistan, IND vs AUS: एका दगडात दोन 'पाकिस्तानी'... रोहित शर्माने केला मोठा पराक्रम!

रोहितने एका पराक्रमाच्या जोरावर दोन पाकिस्तानी खेळाडूंचा विक्रम एकाच वेळी मोडीत काढला.

Rohit Sharma breaks Pakistan Shahid Afridi Record in T20: ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूरात झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात (IND vs AUS 2nd T20) भारतीय कर्णधार रोहित शर्माने तुफानी फलंदाजी केली. रोहितने २० चेंडूमध्ये नाबाद ४६ धावा केल्या. त्यात चार षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघ हा सामना सहा गडी राखून जिंकू शकला.

नागपूरात पावसाने बराच वेळ चाहत्यांची निराशा केली. पण अखेर पावसाने उसंत घेतल्यानंतर दोन्ही बाजूने ८-८ षटकांचा सामना खेळण्याचे निश्चित झाले. ऑस्ट्रेलियाने ८ षटकांत दमदार फटकेबाजी करत ९० धावा केल्या. मॅथ्यू वेडने २० चेंडूत नाबाद ४३ तर कर्णधार आरोन फिंचने १५ चेंडूत ३१ धावा केल्या.

भारताने मात्र 'हिटमॅन'च्या झंझावाती खेळीच्या जोरावर ७.२ षटकांतच सामना खिशात घातला. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. त्यावेळी दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका चोख बजावली. त्याने पहिल्या चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचत सामना संपवून टाकला. रोहित-कार्तिकची गळाभेट साऱ्यांनाच भावली.

रोहित शर्माने या सामन्यात दमदार खेळी केल्यामुळे त्याला दोन मोठे मान मिळाले. सर्वप्रथम रोहित शर्माने भारतीय डावाच्या पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यामुळे रोहित शर्माने न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलला मागे टाकत टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाचा मान मिळवला.

पण भारतीयांना सर्वाधिक रूचणारी गोष्ट म्हणजे, रोहित शर्माने या सामन्यात आणखी एक मोठा पराक्रम केला. या पराक्रमामुळे रोहित शर्माने एकाच दगडाच दोन पक्षी मारले. म्हणजेच, रोहितने या एका पराक्रमाच्या जोरावर दोन पाकिस्तानी खेळाडूंचा विक्रम एकाच वेळी मोडीत काढला. जाणून घ्या नक्की काय आहे तो विक्रम...

रोहित शर्माला मॅचचा 'सामनावीर' घोषित करण्यात आले. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला १२व्यांदा हा मान मिळवला. यासोबतच त्याने प्रत्येकी ११-११ वेळा सामनावीराचा किताब मिळवणारा पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद हाफिज यांना मागे टाकले. तसेच, सर्वाधिक टी२० सामनावीराच्या यादीत आता रोहित दुसरा आहे. यादीत विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वल आहेत.