हिटमॅनला मोठा धमाका करण्याची संधी! पाकच्या आफ्रिदीसह तेंडुलकरच्या सेंच्युरीचा रेकॉर्डही धोक्यात

इथं एक नजर टाकुयात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माच्या निशाण्यावर असलेल्या खास रेकॉर्डवर

भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. कॅप्टन्सी गमावल्यावर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत टीम इंडियात टिकून राहण्यासाठी हा दौरा रोहित शर्मासाठी महत्त्वपूर्ण असेल.

ऑस्ट्रेलियन मैदानात रोहित शर्माचा रेकॉर्ड जबरदस्त राहिला आहे. या दौऱ्यानंतर कदाचित रोहित शर्मा पुन्हा ऑस्ट्रेलियात खेळताना दिसणार नाही. पण तीन सामन्यात अनेक विक्रम प्रस्थापित करत हा दौरा अविस्मरणीय करण्याची संधी त्याच्याकडे आहे. इथं एक नजर टाकुयात त्याला खुणावणाऱ्या एक नव्हे तर अनेक विक्रमाबद्दलची माहिती.

रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शतकी विक्रम मोडण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सचिन तेंडुलकरनं सर्वाधिक ९ शतके झळकावली आहे. रोहित शर्माच्या नावे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत ८ शतकांची नोंद असून दोन शतकी खेळीसह तो सेंच्युरीचा राजा होऊ शकतो.

या दौऱ्यात पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा विक्रमही रोहित शर्माच्या निशाण्यार असेल. वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शाहिद आफ्रिदी ३५१ षटकारांसह सर्वात आघाडीवर आहे. रोहित शर्मानं आतापर्यंत २७३ वनडेत ३४४ षटकार मारले आहेत. तीन सामन्यातील ८ षटकारासह तो या यादीत अव्वलस्थानी विराजमान होईल.

ऑस्ट्रेलियन मैदानात वनडेत १००० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याची संधीही रोहित शर्माकडे आहे. आतापर्यंत त्याने १९ वनडेत ९९० धावा केल्या आहेत. १० धावा करताच तो हा विक्रम आपल्या नावे करेल.

क्रिकेटच्या मैदानातील दादा अर्थात सौरव गांगुलीचा मोठा विक्रमही त्याच्या टप्प्यात आहे. रोहित शर्मानं वनडेत ११ हजार १६८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत ५४ धावा करताच तो सौरव गांगुलीला (११ हजार २२१ धावा) मागे टाकत भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरेल.

रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४९९ सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात तो ५०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. सचिन तेंडुलकर एमएस धोनी, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांच्यानंतर ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पाचवा खेळाडू ठरेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९९ सामन्यात त्याने १९ हजार ७०० धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३०० धावा करुन त्याला २० हजार धावांचा पल्ला पार करण्याची संधी आहे. तेंडुलकर, कोहली आणि द्रविडनंतर हा पल्ला गाठणारा तो चौथा भारतीय ठरेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनत रोहित शर्माकडे १०० सिक्सरचा खास रेकॉर्डही आपल्या नावे करण्याची संधी आहे. आतापर्यंत रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ४६ वनडेत ८८ षटकार मारले आहेत. षटकारांचे शतक साजरे करण्यासाठी त्याला फक्त ८ षटकारांची गरज आहे.