NZ vs ENG 2nd Test : २९ चेंडूंत १२६ धावा! इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने मोडला विनोद कांबळीच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड

NZ vs ENG 2nd Test : इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या दिवशी ६५ षटकांत ३ बाद ३१५ धावा चोपल्या.

इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या दिवशी ६५ षटकांत ३ बाद ३१५ धावा चोपल्या. झॅक क्रॅवली व बेन डकेट हे सलामीवीर अपयशी ठरल्यानंतर हॅरी ब्रूक व जो रूट यांनी शतकी खेळी केली.

झॅक ( २), डकेट ( ९) आणि ऑली पोप ( १०) माघारी परतल्याने इंग्लंडची अवस्था ३ बाद २१ अशी झाली होती. त्यानंतर जो रूट व ब्रूकने २९८ धावांची भागीदारी केली आहे. रूटने १८२ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या आहेत, तर ब्रूकने १६९ चेंडूंत २४ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद १८४ धावा चोपल्या.

हॅरी ब्रूकने ६व्या कसोटी सामन्यात चौथे शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीने भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी याच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या ९ डावांत ( Innings) ८००+ धावा करणारा ब्रूक हा पहिला खेळाडू ठरला. त्याने ८०७ धावांची खेळी करताना कांबळीच्या नावावर ७९८ धावांचा विक्रम मोडला.

हॅरी ब्रुक पहिल्या ९ इनिंग्जमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने कांबळीसह हर्बर्ट शटक्लिफ ( ७८०), सुनील गावस्कर ( ७७८), एव्हर्टन विक्स ( ७७७) व जॉर्ज हेडली ( ७०३) यांनाही मागे टाकले. पण, पहिल्या सहा कसोटींत सर्वाधिक ९१२) धावांचा विक्रम हा सुनील गावस्कर यांच्या नावावरच आहे. त्यानंतर सर डॉन ब्रॅडमन ( ८६२) यांचा क्रमांक येतो.

हॅरी ब्रुकचे हे चौथे कसोटी शतक ठरले आणि पहिल्या ९ डावांत सर्वाधिक चार शतकं झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. विनोद कांबळी, हर्बर्ट शटक्लिफ, सुनील गावस्कर व एव्हर्टन विक्स यांनीही हे पराक्रम केले आहेत.

दरम्यान, जो रूटनेही त्याचे २९वे कसोटी शतक पूर्ण केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाटी नाबाद २९८ धावांची भागीदारी केली आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या विकेटसाठीची इंग्लंडकडून झालेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.

इंग्लंडने पहिल्या कसोटीत २६७ धावांनी विजय मिळवला होता आणि दुसऱ्या कसोटीतही त्यांनी जिंकण्याच्या दृष्टीने खेळ केला आहे. मागील सहा वर्षांत न्यूझीलंडला त्यांच्याच घरी कसोटी मालिकेत हरवणारा इंग्लंड पहिला संघ ठरेल.