Sachin Tendulkar Best XI of IPL 2022 : ना विराट कोहली, ना रोहित शर्मा; सचिन तेंडुलकरच्या आयपीएल २०२२ संघात दोन सप्राईज पॅकेज!

Sachin Tendulkar in His Best XI of IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीग २०२२त नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans ) जेतेपदाची माळ गळ्यात घातली.

Sachin Tendulkar in His Best XI of IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीग २०२२त नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans ) जेतेपदाची माळ गळ्यात घातली. २००८मध्ये राजस्थान रॉयल्सने पहिल्याच प्रयत्नात जेतेपद पटकावले होते आणि त्यानंतर गुजरातने हा करिष्मा केला. त्यांनी अंतिम सामन्यात राजस्थानवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला.

आयपीएल २०२२ मधील कामगिरीच्या जोरावर आता प्रत्येक दिग्गज त्यांचा सर्वोत्तम आयपीएल २०२२ संघ जाहीर करत आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानेही त्याचा सर्वोत्तम आयपीएल २०२२ संघ जाहीर केला. तेंडुलकरने खेळाडूंच्या कामगिरीवरच ही निवड केली आहे.

''खेळाडूची पत आणि मागील कामगिरीचा यात विचार केला गेलेला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, त्यानुसार हा संघ मी निवडला आहे,''असे सचिनने त्याच्या Youtube चॅनेलवर म्हटले. तेंडुलकरने निवडलेल्या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. ''यंदाच्या पर्वात हार्दिकने त्याच्या नेतृत्व कौशल्याची छाप सोडली आहे. तो नेहमी म्हणायचा, खंत करू नका सेलिब्रेशन करा,'' असे सचिन म्हणाला.

मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराने जोस बटलर व शिखर धवन यांची ओपनिंग जोडी म्हणून निवड केली. त्याला त्याच्या संघात लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन हवं आहे. बटलरने ८६३ धावांसह आयपीएल २०२२मध्ये ऑरेंज कॅप नावावर केली. तर धवनने १४ सामन्यांत ४६० धावा केल्या.

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल याला तिसऱ्या क्रमांकावर पसंती दिली गेली आहे. आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत लोकेश ६१६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात दोन शतकांचा समावेश आहे. चौथ्या क्रमांकावर हार्दिकला स्थान दिले गेले आहे.

डेव्हिड मिलर, लिएम लिव्हिंगस्टोन आणि दिनेश कार्तिक अशी पुढची फलंदाजांची फळी सचिनने निवडली आहे. हे तीनही खेळाडू बिग हिटर ठरले आहेत. कार्तिकने पुन्हा एकदा स्वतःला मॅच फिनिशर म्हणून सिद्ध केले आहे.

गोलंदाजी विभागात राशिद खान, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल अशी चौघांची निवड केली आहे. बुमराहचा फॉर्म चांगला नसला तरी तो सर्वोत्तम डेथ बॉलर असल्याचे मत सचिनने व्यक्त केले.

सचिन तेंडुलकरची आयपीएल २०२२ XI : जोस बटलर, शिखर धवन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या ( कर्णधार), डेव्हिड मिलर, लिएम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक, राशिद खान, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल ( Sachin Tendulkar's IPL 2022 XI: Jos Buttler, Shikhar Dhawan, KL Rahul, Hardik Pandya (captain), David Miller, Liam Livingstone, Dinesh Karthik, Rashid Khan, Mohammed Shami, Jasprit Bumrah, Yuzvendra Chahal. )