इशान किशनच्या बाबतीत बरंच काही 'शिजतंय'! वाचा त्याला न निवडण्यामागची Inside Story

दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-२० मालिकेत न मिळालेल्या संधीनंतर इशान किशनने ( Ishan Kishan) BCCI कडे रिलीज करण्याची विनंती केली आणि ती लगेच मान्य झाली. त्यानंतर भारतात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर झाला आणि त्यातून इशान किशनचे नाव गायब दिसले.

अफगाणिस्ताविरुद्धच्या मालिकेतून रोहित शर्मा, विराट कोहली यांचे १४ महिन्यानंतर संघात पुनरागमन होणार आहे. पण, इशान किशनऐवजी यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून जितेश शर्मा व संजू सॅमसन यांची निवड करण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मागील बराच कालावधीपासून इशान किशन हा भारतीय संघाचा सदस्त आहे. त्याने भारतासाठी २ कसोटी, २७ वन डे व ३२ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. ट्वेंटी-२० संघातील स्पेशालिस्ट म्हणून त्याचे नाव घेतले जाते, परंतु तो अचानक राष्ट्रीय संघातून गायब झालेला दिसतोय.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपासूनच हे चित्र दिसतेय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दौरा अर्ध्यावर सोडून त्याने मायदेशी परतण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्याने वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले होते. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत जितेश व संजू यांची निवड केली गेली आहे. कसोटी व वन डे संघातील इशानची जबाबदारी लोकेश राहुलने स्वीकारली आहे.

बीसीसीआयने रविवारी रात्री संघाची घोषणा केल्यापासून, त्याच्या वगळण्याच्या संभाव्य कारणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्याने परवानगीशिवाय टेलिव्हिजन कार्यक्रमात उपस्थित राहिल्यामुळे त्याला शिस्त लागावी यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तेच दुसरीकडे १७ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत संघ सोडण्याची परवानगी घेतल्यानंतर त्याने अद्याप बीसीसीआयला त्याच्या उपलब्धतेबद्दल कळवलेले नाही.

या सगळ्यामुळे कुतूहल निर्माण झाले आहे. बीसीसीआयने त्याच्या निवड न होण्याचे कारण देऊन अटकळ रोखण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. किशन भारतात असल्याची माहिती आहे, पण त्याच्याशी संपर्क होवू शकलेला नाही. झारखंडच्या त्याच्या काही सहकाऱ्यांनीही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.

२५ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाजाने सोमवारी संपलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात राज्यासाठी न खेळण्याचा निर्णय घेतला. राज्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी क्रिकबझला कळवले आहे की ते किशनशी संपर्क साधतील आणि मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्याच्या निवडीबाबत निर्णय घेतील.

दक्षिण आफ्रिकेतील तीनपैकी एकाही ट्वेंटी-२० सामन्यासाठी किशनचा विचार करण्यात आला नाही. नोव्हेंबरमध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये, अन्य सामन्यात शून्यावर बाद होण्यापूर्वी त्याने दोन अर्धशतके केली होती. आता हाती आलेल्या वृत्तानुसार आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बीसीसीआय इशान किशनचा पर्याय शोधत आहे.