नो कंपॅरिझन, पण...! सचिनला ३६५ दिवस लागलेले! विराटने १० दिवसांतच ५० वे शतक ठोकले

आपला सर्वोच्च विक्रम मोडणाऱ्याचा खेळ पाहण्यासाठी वाघाचे काळीज लागते. मोठे मन लागते.

वानखेडेवर आज अजबच माहोल आहे. आपला सर्वोच्च विक्रम मोडणाऱ्याचा खेळ पाहण्यासाठी वाघाचे काळीज लागते. मोठे मन लागते. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज विराट कोहलीचा खेळ पाहत होता.

शतकी धाव घेताच कोहलीने त्याच्याकडे पाहत सलाम ठोकला नंतर शतक साजरे केल्याचा आनंद साजरा केला. न्यूझीलंडच्या खेळाडूंनीही विराट आऊट झाला तेव्हा त्याचे अभिनंदन केले.

विश्व विक्रमी शतक पूर्ण करण्यासाठी सचिनला खूप झगड़ावे लागले होते. विराटलाही काही महिन्यांपूर्वी पुढचे शतक ठोकण्यासाठी झगडावेच लागले होते. परंतू, त्याने पुन्हा वेग पकडत झटपट शतके पूर्ण केली आहेत. सचिनचे ४९ शतकांचे रेकॉर्ड मोडत तो आता शतकांचे अर्धशतक करणारा बनला आहे.

विराटने २९१ सामन्यांपैकी २७९ खेळीत ५० वे शतक पूर्ण केले आहे. परंतू, सचिनला ४९ शतकांसाठी ४५२ सामने खेळावे लागले होते. तेव्हाची परिस्थिती आणि आताची ही फार वेगळी आहे. यामुळे या दोघांची तुलना करणे चुकीचे आहे.

विराटने ४९ वरून ५० वे शतक ठोकण्यासाठी अवघे १० दिवस घेतले आहेत. तर सचिनला जवळपास एक वर्ष म्हणजे ३६५ दिवस वाट पहावी लागली होती. ४८ वरून ४९ वे शतक ठोकताना क्रिकेटच्या देवालाही श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागली होती.

आज विराटने सचिनचा शतकांचाच विक्रम नाही मोडला तर एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचा २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. सचिनने २००३ मध्ये ६७३ रन्स झोडले होते.

परंतू या दिवसांसाठी विराटला थोडी थोडकी नव्हे तर हजार दिवसांची वाट पहावी लागली होती. तब्बल १०२१ दिवसांच्या शतकी दुष्काळाला तोंड दिल्यानंतर विराटने आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. आज विराट कोहली क्रिकेट विश्वाचा बेताज बादशाह बनला आहे.