Chris Gayle hits out at IPL: अपमान झाला म्हणतो तरी पुढील वर्षी IPL खेळणार; ख्रिस गेलने सांगितले 'त्या' संघांचे नाव!

Chris Gayle hits out at IPL वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल ( Chris Gayle) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, या निर्णयामागचं धक्कादायक कारण त्याने आज जगासमोर आणले.

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल ( Chris Gayle) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, या निर्णयामागचं धक्कादायक कारण त्याने आज जगासमोर आणले. मागील काही वर्षांत त्याला आयपीएलमध्ये अपेक्षित आदर मिळव नव्हता, असा गौप्यस्फोट त्याने केला.

आयपीएलमधील मोठा स्टार असलेल्या गेलने आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स अशा तीन फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले. पण, आयपीएलच्या मागील काही वर्षांत गेलला अंतिम ११मध्येही ग्राह्य धरले गेले नव्हते. त्यानंतर त्याने आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात बायो बबलच्या थकव्यामुळे माघार घेतली.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत गेल सातव्या क्रमांकावर आहे. युनिव्हर्स बॉस गेलच्या नावावर ६ शतकं आहेत आणि आयपीएलमध्या आतापर्यंत इतकी शतकं कोणाला मारता आलेली नाही. त्याच्या नावावर १४२ सामन्यांत ४९६५ धावा आहेत.

तो म्हणाला,''मागील काही वर्षांत मला आयपीएलमध्ये नीट वागणूक दिली गेली नाही. माझा अपमान झाला असे सतत मला वाटायचे. या खेळासाठी आणि आयपीएलसाठी एवढं योगदान देऊनही आदर मिळत नसेल, तर मी माघार घेतलेली बरी, असे मला वाटले. त्यामुळे मी आयपीएल २०२२च्या ड्राफ्टमध्ये नाव नोंदवले नाही.''

२०२१मध्ये झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गेलने अखेरचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विंडीज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तो फेब्रुवारी २०२२मध्ये बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळला होता. आता त्याने आयपीएल २०२३ मध्ये पुनरागमन करणार असल्याचे सांगितले आहे.

''पुढील वर्षी मी येतोय... त्यांना माझी गरज आहे,''असे गेल म्हणाला. गेलने २०११ ते २०१७ या कालावधीत RCB कडून खेळाताना ८५ सामन्यांत ३१६३ धावा केल्या आहेत. २०१८च्या आयपीएलमध्ये तो अनसोल्ड राहिला होता, परंतु पंजाब किंग्सने त्याच्यावर विश्वास दाखवला.

पंजाबने त्याला १७ सामने खेळण्याची संधी दिली. ''आयपीएलमध्ये मी कोलकाता, बंगळुरू व पंजाब अशा तीन संघांचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी बंगळुरू व पंजाब यांच्याकडून मला जेतेपद जिंकायला आवडेल. RCBसोबतचा कार्यकाळ अविस्मरणीय होता आणि आयपीएलमध्ये या संघाकडून मी अधिक यश मिळवले. पंजाबही चांगला संघ आहे. मला आव्हानं आवडतात, बघुया काय होतं ते.''