३४ व्या वर्षी कसोटी संघात पदार्पण; पाकिस्तानी गोलंदाजानं केला ७२ वर्षांत कुणालाच न जमलेला पराक्रम!

पाकिस्तान क्रिकेट संघानं कराची येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवण्याच्या दिशेनं कूच केली आहे.

आफ्रिकेचा दुसरा डाव २४५ धावांवर गडगडल्यानं पाकिस्तानसमोर विजयासाठी ८८ धावांचं माफक लक्ष्य राहिले आहे.

पाकिस्तानसमोर ८८ धावांचे लक्ष्य आहे. यापूर्वी १८८२मध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लंडविरुद्ध ८८ धावांचा यशस्वी बचाव केला होता.

एडन मार्कराम ( ७४), रॅसी व्हेन डेर ड्युसेन ( ६४) आणि टेम्बा बवुमा ( ४०) हे वगळता आफ्रिकेचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांसमोर त्यांनी नांग्या टाकल्या.

नौमन अली ( Nauman Ali) आणि यासीर शाह ( Yasir Shah) यांनी दुसऱ्या डावात अनुक्रमे ५ व ४ विकेट्स घेत पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला. नौमननं ३५ धावांत ५ विकेट्स घेत इतिहास रचला.

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून नौमननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. वयाच्या ३४ व्या वर्षी कसोटीत पदार्पण करणारा तो पाकिस्तानचा पहिलाच खेळाडू ठरला होता. पण शुक्रवारी त्यानं मोठी कामगिरी केली.

नौमननं पहिल्या डावात २ विकेट्स घेतल्या होत्या आणि दुसऱ्या डावात त्याच्या नावावर ५ विकेट्स नोंदवल्या गेल्या.

३४ वर्ष व ११४ दिवसांच्या नौमन हा पुरुष कसोटी क्रिकेटच्या ७१ वर्षांच्या इतिहासात पदार्पणात पाच विकेट्स घेणारा वयस्कर खेळाडू ठरला, तर ८७ वर्षांतील सर्वात वयस्कर फिरकीपटू ठरला.

कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेणारा नौमन हा पाकिस्तानचा १२वा आणि पहिलाच लेफ्ट आर्म फिरकीपटू आहे.