निवृत्ती घेतली तेव्हाच ठरवलेलं देशाविरुद्ध खेळायचे; भारताच्या माजी कर्णधाराचं वादग्रस्त विधान

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर भारताच्या माजी क्रिकेटपटूने भारताविरुद्ध खेळण्याचा निर्धार व्यक्त केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

भारताला २०१२ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद ( Unmukt Chand) हा अमेरिका व वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. उन्मुक्तने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे आणि तो अमेरिकेत स्थायिक झाला आहे. तो वर्ल्ड कपमध्ये अमेरिका संघाचे प्रतिनिधित्व करू शकतो.

कॅरिबियन आणि अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन महिने अगोदर उन्मुक्त अमेरिकेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची पात्रता पूर्ण करत आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतल्यानंतर, त्याने अमेरिकेत वार्षिक दहा महिने असे तीन वर्ष राहण्याची पात्रता जवळपास पूर्ण केली आहे.

२०१० च्या दशकाच्या सुरुवातीला उन्मुक्त चंद हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात आशाजनक प्रतिभावंत खेळाडूंपैकी एक नाव मानले जात होते. विशेषत: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेता कर्णधार म्हणून त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याच्याकडे भविष्याचा स्टार म्हणून पाहिले गेले.

पण, स्पर्धेनंतर वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. त्यानंतरच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खराब कामगिरीमुळे त्याला चांगल्या संधींसाठी दिल्लीहून उत्तराखंडला जावे लागले. उन्मुक्तने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६७ सामन्यांत ३३७९ धावा केल्या आणि त्यात ८ शतकं व १६ अर्धशतकांचा समावेश आहे. १२० लिस्ट ए क्रिकेटमध्ये ७ शतकं व ३२ अर्धशतकांसह त्याने ४५०५ धावा नावावर केल्या आहेत.

२०२१ मध्ये उन्मुक्त अमेरिकेला स्थलांतरित झाला. जिथे त्याने सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्सला उद्घाटन मायनर लीग क्रिकेट ट्वेंटी-२०मध्ये विजय मिळवून दिला आणि तीन हंगामात १५०० हून अधिक धावा केल्या. उन्मुक्तला यूएसएचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडले गेले तर, तो भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध खेळू शकतो.

"हे खूप विचित्र असेल (हसला), पण मला वाटते की मी निवृत्त झाल्यापासून, माझे पुढचे लक्ष्य नेहमीच भारताविरुद्ध खेळणे हे होते. हे कोणत्याही वाईट भावनेतून नसून, स्वतःची क्षमता तपासून पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. भारत हा जगातील सर्वोत्तम संघ आहे,” असे उन्मुक्तने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.