"भारताविरूद्ध हरलोय पण हिम्मत हारलो नाही...", पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने दिला इशारा

१४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते.

वन डे विश्वचषकात सलग आठव्यांदा पाकिस्तानी संघाला भारताविरूद्ध पराभव स्वीकारावा लागला. १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते.

दारूण पराभवानंतर पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली जात आहे. यजमानांविरूद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर शेजाऱ्यांची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने चाहत्यांना एक आवाहन केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक व्हिडीओ शेअर करून पाकिस्तानी चाहत्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. रिझवान म्हणाला की, विश्वचषकातील प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा असतो. हार जीत होतच असते. भारताकडून हरलो पण त्याच्या आधीचे दोन सामने आम्ही जिंकले आहेत.

तसेच आमचा संघ कौशल्याच्या बाबतीत सर्वोत्तम आहे. क्षेत्ररक्षणाची बाजू थोडी कमजोर आहे हे मान्य करतो. मात्र आमच्याकडे जगातील सर्वात घातक गोलंदाज आहेत, असेही रिझवानने नमूद केले.

"पाकिस्तानी फिरकीपटू बळी घेऊ शकत नाहीत असे बोलले जात आहे. हे खरे आहे पण शादाब खान सारख्या खेळाडूमध्ये कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे मी चाहत्यांना आवाहन करतो की, आम्ही भारताविरूद्ध हरलो असलो तरी हिम्मत हारलो नाही", असे रिझवानने सांगितले.

आपल्या देशातील नागरिकांसह चाहत्यांचे आभार मानताना रिझवानने म्हटले की, आम्ही आगामी काळात चांगला प्रयत्न करून नक्कीच पाकिस्तानला एक वेगळा रिझल्ट देऊ. पाकिस्तानी जनतेने आम्हाला दिलेले प्रेम याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो.

पाकिस्तानचा मोठा पराभव करून भारताने चालू विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक लगावली. पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने भारताविरूद्ध अर्धशतकी खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली.

विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.