IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या गोलंदाजाचं अनोखं 'शतक', स्टार्कच्या खात्यात भोपळा

Mitchell Starc in IPL 2024: मिचेल स्टार्कला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अद्याप एकही बळी घेता आला नाही.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाईट फ्रँचायझीने स्टार्कवर पैशांचा वर्षाव केला.

मिचेल स्टार्कचे मोठ्या कालावधीनंतर जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये पुनरागमन झाले आहे. आयपीएल २०२४ मधील पहिले दोन सामने स्टार्कसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिले.

सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. मिचेल स्टार्क श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरच्या संघाचा भाग आहे.

केकेआरने आपल्या सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात केकेआरसाठी हर्षित राणाने मॅचविनिंग खेळी केली. पण, स्टार्क प्रभाव पाडू शकला नाही.

हैदराबादपाठोपाठ आरसीबीविरूद्धच्या सामन्यात देखील मिचेल स्टार्कची बेक्कार धुलाई झाली. त्याने आतापर्यंत टाकलेल्या ८ षटकांत १०० धावा दिल्या आहेत. एकूणच स्टार्कने अनोखे शतक ठोकले.

लक्षणीय बाब म्हणजे अद्याप स्टार्कला एक देखील बळी घेता आला नाही. त्याने सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात ५३ तर आरसीबीविरूद्ध ४७ धावा दिल्या.

आयपीएल लिलावात मिचेल स्टार्क कोणत्या संघात जाणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठी चुरस झाली. यॉर्कर किंगला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी दोन्हीही फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखवली.

दिल्लीने माघार घेतल्यानंतर केकेआरने यात उडी घेतली. मग गुजरात टायटन्सने देखील स्टार्कला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. केकेआर आणि गुजरातच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजण्याची तयारी कायम ठेवली अन् १४ कोटींवर बोली गेली तरी स्टार्क लिलावाच्या रिंगणात कायम राहिला.

आकडा २० कोटीवर गेला तरी बोली चालू होती. केकेआरने अखेर तब्बल २४.७५ कोटीत स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. यासह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. २०१५ नंतर तब्बल आठ वर्षांनंतर स्टार्कचे आयपीएलमध्ये पुनरागमन झाले आहे.