RCB ने युजवेंद्र चहलला संघातून का रिलीज केले? माईक हेसन यांचा धक्कादायक खुलासा

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या हंगामापूर्वी युजवेंद्र चहलला संघाने का रिलीज केले आणि मेगा ऑक्शनमध्ये का खरेदी नाही केले, यामागचं कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे माजी क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी उघड केले.

युजवेंद्र चहल हा RCBच्या अव्वर पाच खेळाडूंपैकी एक असल्याचे हेसन यांनी म्हटले. २०२१ मध्ये त्याने अविश्वसनीय कामगिरी केली होती, परंतु तरीही आयपीएल २०२२पूर्वी त्याला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला गेला. आयपीएल २०२१ मध्ये त्याने ७.०५ च्या इकॉनॉमीने १८ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्या पर्वात तो दुसरा सर्वोत्तम गोलंदाज होता.

२०२२ हंगामाच्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझींना फक्त ३ खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती आणि RCB ने विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी) आणि मोहम्मद सिराज ( ७ कोटी) या तीन खेळाडूंनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

चहल ऑक्शनमध्ये मोठी बोली लावून RCB पुन्हा आपल्या ताफ्यात घेईल असे अनेकांना वाटले होते. पण, त्यांनी त्याच्यासाठी बोलीच लावली नाही आणि राजस्थान रॉयल्सने ६.५० कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतले.

'अनवाइंड विथ क्रिकेट डॉट कॉम' शोमध्ये बोलताना हेसन यांनी नेमकी काय चूक झाली आणि आरसीबी चहलला बंगळुरूला परत का आणू शकले नाही हे सांगितले. “आम्ही फक्त ३ खेळाडू राखून ठेवले, कारण आम्हाला लिलावात हर्षल पटेल आणि युझी या दोघांना परत घ्यायचे होते. केवळ तीन खेळाडूंना रिटेन केल्याने आम्हाला ते करण्यासाठी अतिरिक्त चार कोटी मिळाले,” असे हेसन शोमध्ये बोलताना म्हणाले.

“युझी आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असूनही तो पहिल्या दोन मार्की यादीत स्थान मिळवू शकला नाही, हे हास्यास्पद होते. लिलाव यादीत तो क्रमांक ६५ वर आला, याचा अर्थ असा होतो की आम्हाला तो मिळेल याची खात्री देणे खरोखर कठीण होते. आम्ही मॉक लिलावात खूप वेळ घालवला होता,''हे त्यांनी कबुल केले.

ते पुढे म्हणाले,''पहिल्या तीन सेटमध्ये हर्षल होता पण युझी सहा सेट खाली होता. जर आम्ही आमची सर्व रक्कम वाचवली असती आणि सहा सेटची वाट पाहिली असती, तर आमच्यापेक्षा जास्त पैसे असलेले पाच संघ आहे, हे आम्हाला माहित होते. समजा त्याआधी आम्ही सर्व गोलंदाज सोडून दिले असते आणि तरीही युझीला संघात घेण्यात अयशस्वी झालो असतो, तर आम्हाला लेग-स्पिनरशिवाय राहावे लागले असते,''असे हेसन म्हणाले.

"पण होय, आम्ही युझीला संभाव्यपणे कसे खरेदी करू शकतो यावर चर्चा करण्यासाठी मॉक लिलावात तासन तास घालवला," असेही ते म्हणाले.