महेंद्रसिंग धोनीवर बंदी घालावी लागेल, अशी वेळ आणू नका; वीरेंद्र सेहवागचं CSKच्या गोटात चिंता व्यक्त करणारं विधान

IPL 2023 : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) याने चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर बंदी घातली जाईल अशी वेळ आणू नका असं विधान केलं आहे.

CSK ने काल चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ८ धावांनी रोमहर्षक विजयाची नोंद केली. पण, या सामन्यानंतर वीरू संतापला आहे आणि त्याने CSKच्या गोटात चिंता व्यक्त होईल, असं विधान केलं आहे.

ऋतुराजला ( ३) स्वस्तात माघारी जावे लागले. पण, अजिंक्य रहाणे ( ३७) व डेव्हॉन कॉनवे ( ८३) यांनी ४३ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी केली. शिवम दुबे ( ५२) आणि कॉनवे यांनी ३७ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. कॉनवे ४५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. चेन्नईने ६ बाद २२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या आकाश सिंगने पहिल्याच षटकात विराट कोहलीची ( ६) विकेट मिळवून दिली. त्यानंतर तुषार देशपांडेने महिपाल लोम्रोरला ( ०) माघारी पाठवले.

फॅफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी CSKच्या गोलंदाजांनी चांगली धुलाई केली. मॅक्सवेल ३६ चेंडूंत ३ चौकार व ११ षटकारांसह ७६ धावांवर बाद झाला. मॅक्सवेल व फॅफची ६१ चेंडूंतील १२६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. फॅफ ३३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर धोनीच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर RCBचा डाव गडगडला अन् त्यांना ८ बाद २१८ धावाच करता आल्या. चेन्नईने ८ धावांनी हा सामना जिंकला.

वीरेंद्र सेहवागने CSK च्या गोलंदाजांना खूप Wide आणि No Ball टाकल्याबद्दल फटकारले आहे. त्याने चेन्नईच्या गोलंदाजांना इशारा देताना सांगितले की, 'ते अशीच गोलंदाजी करत राहिले, तर कर्णधार धोनीवर स्लो ओव्हर रेटमुळे बंदी येऊ शकते'. जर आपण आकडेवारी पाहिली तर, यावर्षी चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी खूप जास्त धावा दिल्या आहेत. RCB विरुद्धच्या सामन्यात CSKच्या गोलंदाजांनी ११ अतिरिक्त धावा दिल्या होत्या, त्यापैकी ६ Wide होत्या.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सेहवाग म्हणाला,''चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी दिलेल्या अतिरिक्त धावांच्या संख्येमुळे धोनी नाखूष दिसत होता. धोनी आनंदी दिसत नव्हता कारण त्याने आधीच सांगितले आहे, की त्याला गोलंदाजांनी No Balls आणि Wide ची संख्या कमी करायला हवी. CSK ने RCB विरुद्ध आणखी एक अतिरिक्त ओव्हर टाकले. कर्णधार धोनीवर बंदी घातली जाऊ शकते आणि संघाला कर्णधाराशिवाय मैदानात उतरावे लागेल, अशी वेळ येऊ देऊ नका.''

सेहवाग पुढे म्हणाला, ''त्याच्या गुडघ्याला ज्या प्रकारची दुखापत झाली आहे, त्यावरून तो अजून काही सामने खेळू शकेल असे दिसते. तो सतत स्वत:ला पूश करत असतो पण त्याचे गोलंदाज असे Wide आणि No Balls टाकत राहिले तर धोनीला विश्रांती घ्यावी लागेल. ''

सेहवाग पुढे म्हणाला, ''मी पहिल्या दिवसापासून म्हणत आलो आहे, की चेन्नईची गोलंदाजी कमकुवत आहे. त्यांना प्रत्येक विभागात काम करण्याची गरज आहे. पण ते आणखी काय करू शकतात? त्यांच्याकडे जी काही संसाधने आहेत, ती त्यांना या हंगामात वापरावी लागतील. त्यांच्या गोलंदाजांना अधिक अचूक गोलंदाजी करावी लागेल.''