यांच्यावर आहे भारताची मदार

ढोणीच्या भाषेत सर रविंद्र जाडेजा फलंदाज म्हणून अद्याप फारसे चमकलेले नसले तरी ९ गडी बाद करत त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. घणाघाती फलंदाजी किंवा उपयुक्त गोलंदाजी ही जाडेजाची अस्त्रं आहेत.

कॅरम बॉल टाकत फलंदाजांना आश्चर्यचकित करणा-या आर अश्विनने १२ गडी घेत या विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. गुरुवारी त्याने कागारुंना नियंत्रणात छेवावं अशी अपेक्षा आहे.

भारताला असलेली तिस-या तेज गोलंदाजाची कमी मोहीत शर्मानं काही प्रमाणात भरून काढलेली असून त्याने या विश्वचषकात ११ बळी मिळवले आहेत.

शामीला अत्यंत चांगली साथ देत मराठमोळ्या उमेश यादवने विश्वचषकामध्ये १४ गडी बाद केले आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधातही त्याने जोरदार कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे.

या विश्वचषकात सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या शर्यतीत असलेल्या मोहम्मद शामीने १७ बळी मिळवले असून शामी हा भारताचा भरवशाचा तेज गोलंदाज झाला आहे. गुरुवारी त्याने कागारुंच्या आघाडीच्या फलंदाजांना लवकर तंबूत धाडावं अशी अपेक्षा आहे.

पहिल्या चेंडूपासून सेट झालेला फलंदाज असं वर्णन ज्याचं केलं जातं त्या सुरेश रैनानं या विश्वचषकात २७७ धावा केल्या असून संघाची अवस्था बिकट असताना त्याला बाहेर काढणं यात याचा हातखंडा आहे. धावांची गती वाढवण्याच्या रैनाच्या क्षमतेकडे उद्या सगळ्यांचे लक्ष असेल.

सात सामन्यात ३०४ धावा केलेल्या विराट कोहलीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हमखास खेळणारा विराट उद्याही खेळेल आणि भारताला मोठी धावसंख्या उभारून देईल अशी आशा आहे.

या विश्वचषकात ३६७ धावा केलेल्या शिखर धवनने जलग सुरुवात कून दिली तर मोठी धावसंख्या आकाराला येण्यास वाव. शैलीदार डावखुरा फलंदाज असलेला धवन १० ते १५ षटके मैदानावर टिकणं उद्या महत्त्वाचं ठरणार आहे.

१६७ धावा या विश्वचषकात केलेल्या अजिंक्य रहाणेसाठी विश्वचषक गाजवण्याची एक संधी गुरुवारी आहे. मधल्या खेळीतल्या या तंत्रशुद्ध फलंदाजावर भारतीय डावाला आकार देण्याची जबाबदारी आहे.

महेंद्र सिंग ढोणीने या विश्वचषकामध्ये १७२ धावा केल्या असून खालती फलंदाजी करताना अत्यंत मोक्याच्या क्षणी मोलाची खेळी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे कागारुंविरोधात शांतचित्त राहण्यात त्याच्यातल्या कर्णधाराची कसोट लागणार आहे.

सात सामन्यांत २९६ धावा काढलेल्या रोहीत शर्माची बॅट तळपली तर भारत मोठी धावसंख्या उभारेल यात काहीच शंका नाही. खुद्द सचिन तेंडुलकर फिदा असलेल्या या मुंबईकराची बॅट कांगारुंविरोधात लागू दे अशीच सगळ्यांची इच्छा आहे.