IRE vs NZ: ७१९ धावांचा पाऊस! आयर्लंडने दिली टफ फाईट, थरारक सामन्यात न्यूझीलंडने १ धावेने मारली बाजी

Ireland vs New Zealand 3rd ODI : आयर्लंडने आज क्रिकेट चाहत्यांची मन जिंकली. समोर न्यूझीलंड सारखा तगडा संघ असूनही आयर्लंडने टक्कर देणे काय असते हे पुन्हा एकदा दाखवून दिले.

Ireland vs New Zealand 3rd ODI : आयर्लंडने आज क्रिकेट चाहत्यांची मन जिंकली. समोर न्यूझीलंड सारखा तगडा संघ असूनही आयर्लंडने टक्कर देणे काय असते हे पुन्हा एकदा दाखवून दिले. आयर्लंडला पहिल्या वन डे सामन्यात १ विकेटने हार मानावी लागली, आज १ धावेने त्यांचा हातचा सामना हिरावून घेतला. तिसऱ्या वन डेत ३६१ धावांचे लक्ष्य समोर असूनही आयर्लंडचे खेळाडू डगमगले नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला, परंतु त्यांना १ धावेने हार मानावी लागली.

मार्टिन गुप्तिल व फिन अॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडताना किवींना चांगली सुरुवात करून दिली. फिन अॅलन २८ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ३३ धावांवर माघारी परतला. गुप्तिल व कर्णधार टॉम लॅथम यांनी ६० धावांची भागीदारी केली. लॅथम २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३० धावांवर बाद झाला. त्यानंतर गुप्तिलची विकेट पडली. त्याने १२६ चेंडूंत १५ चौकार व २ षटकारांसह ११५ धावा चोपल्या.

यानंतर हेन्री निकोल्सने मोर्चा सांभाळला. त्याला ग्लेन फिलिप्स, मिचेल ब्रेसवेल व मिचेल सँटनर यांची साथ मिळाली. निकोल्सने ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावा केल्या. फिलिप्सने ३० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या. ब्रेसवेलनेही १६ चेंडूंत १ चौकार व १ षटकारासह नाबाद २१ धावा, तर सँटनरने १० चेंडूंत २ चौकारांसह नाबाद १४ धावा केल्या. न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ३६० धावा चोपल्या.

प्रत्युत्तरात पॉल स्टेर्लिंग आणि २२ वर्षीय हॅरी टेक्टर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १७९ धावांची विक्रमी भागीदारी केली. २ बाद ६२ वरून या दोघांनी सामना २४१ धावांपर्यंत आणला. पॉल १०३ चेंडूवर १४ चौकार व ५ षटकारासह १२० धावा करून माघारी फिरला.

टेक्टरने या मालिकेतील दुसरे शतक झळकावले. १०६ चेंडूवर त्याने १०८ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ७ चौकार व ५ षटकार होते. टेक्टर बाद झाला तेव्हा आयर्लंडच्या ४३.३ षटकांत ३१० धावा झाल्या होत्या आणि त्यांना उर्वरित २७ चेंडूत विजयासाठी ५१ धावा हव्या होत्या.

जॉर्ज डॉकरेलने (२२) सामना ९ चेंडू १२ धावा असा आणून ठेवला. अखेरच्या २ चेंडूवर ४ धावा हव्या असताना आयर्लंडला २ धावा करता आल्या आणि ९ बाद ३५९ धावाच केल्याने आयर्लंडला १ धावेने हार मानावी लागली.