IPL 2023: महेंद्रसिंग धोनी कधी आणि कसा देणार IPLला निरोप? रवींद्र जडेजाने दिली महत्त्वाची अपडेट, फॅन्सना बसेल धक्का

Mahendra Singh Dhoni: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. या वर्षीच्या जुलै महिन्यात ४२ वर्षांचा होणार आहे. या दरम्यान, धोनीचा चेन्नई सुपरकिंग्समधील सहकारी असलेल्या रवींद्र जडेजाने धोनीच्या निवृत्तीबाबत मह्त्त्वाची अपडेट दिली आहे.

आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. या वर्षीच्या जुलै महिन्यात ४२ वर्षांचा होणार आहे. या दरम्यान, धोनीचा चेन्नई सुपरकिंग्समधील सहकारी असलेल्या रवींद्र जडेजाने धोनीच्या निवृत्तीबाबत मह्त्त्वाची अपडेट दिली आहे.

धोनीने २०२२ मध्येच चेन्नईचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आलं होतं. मात्र जडेजा हंगामाच्या मध्येच कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. त्यानंतर धोनीने पुन्हा चेन्नईचं कर्णधारपद सांभाळलं. तसेच २०२३ च्या हंगामासाठी त्यालाच कर्णधार बनवण्यात आलं आहे. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सने दोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलची ४ विजेतेपदे पटकावली आहेत.

लखनौविरुद्धा झालेल्या सामन्यापूर्वी रवींद्र जडेजाने एका टॉक शोमध्ये महेंद्रसिंग धोनीबाबत महत्त्वाची माहिती दिली. तो म्हणाला की, महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यावेळी जडेजा धोनीच्या निवृत्तीबाबत म्हणाला की, निवृत्ती हा असा एक निर्णय आहे, ज्याबाबत केवळ धोनीलाच नेमकं काय करायचं हे माहिती असेल.

जडेजा म्हणाला की, धोनी एका आणखी हंगामासह परत येत आहे. त्याला पाहणं ही क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी आहे. तो आपल्या निर्णयाबाबत जाणतो. तसेच तो काय करत आहे, हेही त्याला माहिती असते. चेन्नईच्या व्यवस्थापनामधील कुणीही त्याला काय करायचं आहे हे सांगणार नाही. तो खेळू इच्छित असेल तर राहील, तसेच निवृत्त व्हायचं असेल तर तो निवृत्त होईल. जेव्हा धोनीला आयपीएलमधून निवृत्त व्हायचं असेल, तेव्हा तो शांतपणे निवृत्त होईल, असंही जडेजानं सांगितलं.

जडेजा म्हणाला की, आमच्याकडे खूप आठवणी आहेत. २०१८ मध्ये आम्ही चेन्नईत परत आलो. जेव्हा आम्ही सराव सत्रासाठी जाताना ओपन बसमधून प्रवास केला, तेव्हा फॅन्स जागोजागी गोळा झाले होते. ते रडत होते. धोनीला पुन्हा सीएसकेकडून खेळताना पाहायला मिळेल, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करत चेपॉकवर दिमाखात पुनरागमन केलं होतं.