IPL 2023 : चुकीला माफी नाही! विराट कोहलीवर होऊ शकते बंदीची कारवाई; RCBच्या आजच्या सामन्यानंतर फैसला

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यानंतर स्लो ओव्हर रेटसाठी विराट कोहलीला ( Virat Kohli) २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याआधी लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी २० षटकं पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला. त्यानंतर संघाचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसवर १२ लाखांचा दंडाची कारवाई केली होती.

सोमवारी हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरलाही १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. आज कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विराटकडून पुन्हा ही चूक झाली, तर त्याच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते.

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला ९० मिनिटांत एक डाव संपवावा लागतो. यात प्रत्येकी अडीच मिनिटांच्या टाईम आऊटचा समावेश आहे. खेळाडूंना दुखापत झाली किंवा DRS घेतला असला तरी त्यांच्या वेळेचा यात समावेश नाही. म्हणजेच DRS चा वेळ ९० मिनिटांत स्वतंत्रपणे जोडला जातो. यानंतरही, जर एखाद्या संघाला वेळेत संपूर्ण षटकं टाकता आली नाहीत, तर तो स्लो ओव्हर रेट मानला जातो.

पहिल्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधाराला १२ लाखांचा दंड भरावा लागतो. लखनौविरुद्धच्या सामन्यात फॅफ ड्यू प्लेसिसला दंड ठोठावण्यात आला होता. त्याच मोसमात दुसऱ्यांदा असे घडल्यास कर्णधाराला २४ लाखांचा दंड ठोठावला जातो.

राजस्थानविरुद्ध विराट कर्णधार होता आणि त्याला २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कर्णधारासोबतच संघातील इतर सदस्यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. कर्णधार वगळता, संघातील इतर सदस्यांना एकतर ६ लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या २५% (जी रक्कम कमी असेल ) दंड आकारला जातो.

तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी संघ दोषी आढळल्यावर संघाच्या कर्णधाराला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो. यासोबतच एका सामन्याची बंदीही घालण्यात येते. यासोबतच संघातील उर्वरित सदस्यांना प्रत्येकी १२ लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या ५० % (जे कमी असेल) दंड ठोठावण्यात आला आहे. चौथ्यांदा किंवा त्यानंतरही असेच चालू राहिल्यास तिसर्‍यांदा प्रमाणेच दंड आकारला जातो.

जर एखाद्या संघाने बंदी टाळण्यासाठी कर्णधार बदलला तर नवीन कर्णधारावर बंदी घातली जाईल. फ्रँचायझीने बीसीसीआयला त्यांच्याकडून कर्णधार बदलल्याचे लेखी कळवले तरच नवीन कर्णधारावर ही बंदी लादली जाणार नाही. त्यामुळे विराटच्या जागी फॅफ डू प्लेसिस पुन्हा कर्णधार झाल्यास त्याच्यावर बंदी घालण्यात येईल.